सिंदेवाही:- हत्तीरोग उच्चाटण करण्याच्या अनुषंगाने हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ जिल्हयातील सिंदेवाही येथुन करण्यात आला हि मोहिम १० फेब्रुवारी २०२३ ते २० फेब्रुवारी २०२३ या दरम्यान राबविण्यात येणार आहे. मोहिमेचे उदघाटन नगरपंचायत येथे तहसिलदार मा. श्री. गणेश जगदाळे यांनी प्रत्यक्ष गोळया खाऊन केले. या मोहिमेकरीता ४४७ जणांची चमू व ४५ पर्यवेक्षकांची निवड करण्यात आली आहे.
कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणुन सिंदेवाही नगरपंचायत चे नगराध्यक्ष मा. स्वप्निल कावळे तसेच मयूर सूचक उपनगराध्यक्ष ,नगरपंचायत सर्व सदस्य गण तसेच तालुका आरोग्य अधिकारी मा. श्री. डॉ. प्रफुल सुने , डॉ. बोधेले मॅडम श्री. सुनिल हेमके तालुका आरोग्य पर्यवेक्षक, श्री.कमलेश चव्हाण तालुका हिवताप तांत्रिक पर्यवेक्षक, श्री. महाजनवार आरोग्य सहाय्यक(phc वासेरा) श्री. मोहुर्ले,श्री. शेंडे आरोग्यसेवक आदी उपस्थित होते.सिंदेवाही तालुक्यातुन हत्तीरोग हृददपार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या घरी येणा-या आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेवक, यांच्या कडुन देण्यात येणा-या गोळ्यांचे सेवन त्यांच्या समक्ष करण्याचे आवाहन मा. नगराध्यक्ष व तहसिलदार साहेब यांनी समस्त जनतेला केले.
तीन प्रकारच्या गोळयांचे वितरण
या मोहिमेदरम्यान तीन प्रकारच्या गोळया देण्यात येणार आहेत. आयव्हरमेक्टीन ही गोळी उंचीनुसार, डि.ई.सी. गोळी वयानुसार, अल्बेंडाझोल हि गोळी प्रत्येकी एक याप्रमाणे दयायची आहे. या गोळयांचे सेवन २ वर्षाखालील बालकांनी गरोदर मातांनी, सात दिवसांच्या स्तनदा मातांनी आणि अती गंभीर आजारी व्यक्तींनी करु नये. या गोळया उपाशीपोटी घेऊ नये असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर यांनी सांगितले आहे. सर्वांनी आपल्या घरी येणा-या कर्मचा-यांना सहकार्य करुन गोळयांचे सेवन करावे, असे आवाहन डॉ. प्रफुल सुने तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.