Top News

खेळाडू विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन करणाऱ्या व्यवस्थापक व प्रशिक्षकावर कारवाई करा:- शैलेश दिंडेवार #chandrapur #ABVP


अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक; तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा


चंद्रपूर:- चेन्नई येथे आयोजित बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठातर्फे गेलेल्या खेळाडू विद्यार्थिनींसोबत प्रशिक्षक व व्यवस्थापकाने मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनींनी गोंडवाना विद्यापीठात तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे. गोंडवाना विद्यापीठ सुरवातीपासून कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. खेळाडू विद्यार्थीनी सोबत झालेल्या गैरवर्तनाचा मुद्दा सुध्दा गोंडवाना विद्यापीठाच्या सभेत गाजण्याची शकता आहे.गैरवर्तन करणाऱ्या प्रशिक्षक व व्यवस्थापकांच्या विरोधात गोंडवाना विद्यापीठ कोणती कार्यवाही करणार या भूमिकेकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोंडवाना विद्यापीठाकडून २५ जानेवारी रोजी चेन्नई येथे होऊ घातलेल्या बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी दहा विद्यार्थीनींची चमू पाठविण्यात आली होती. त्यांच्यासोबत प्रशिक्षक म्हणून राजेश हजारे व व्यवस्थापक डॉ. विजय सोमकुंवर हे होते. मात्र या दोघांनी चेन्नईत गेल्यापासून मद्यप्राशन करून खेळाडू मुलींसोबत गैरवर्तन सुरू केले. ते इतक्यावरच न थांबता अमरावती व मुंबई विद्यापीठातील खेळाडू मुलींसोबत देखील चार्जर मागण्याच्या बहाण्याने खोलीत जाऊन गैरवर्तन केले. स्पर्धे दरम्यान पूर्ण वेळ हे दोघे दारूच्या नशेत असायचे. त्यामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. स्पर्धा संपवून परत आलेल्या मुलींनी सोमवारी तत्काळ प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची आपबिती सांगून तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे.

कोणत्याही विद्यापीठातील महिला खेळाडूंना स्पर्धांसाठी पाठवितांना महिला प्रशिक्षक किंवा सहकारी देणे आवश्यक आहे. मात्र गोंडवाना विद्यापीठाकडून खेळाडू विद्यार्थीनीच्या सेफ्टीकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे चित्र आहे. हा सर्व प्रकार संतापजनक आहे. त्यामुळे दोषी प्रशिक्षक व व्यवस्थापकाला तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी.अन्यथा महाविद्यालामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिल्हा चंद्रपूर चे जिल्हा संयोजक शैलेश दिंडेवार यांनी दिला आहे. तसे निवेदन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार यांनी देण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने