Top News

पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले #chandrapur #Yawatmal #murder


रागाच्या भरात पतीने पत्नीला मारहाण करीत केले ठार


यवतमाळ:- पत्नीचे गावातील तरुणासोबत अनैतिक संबंध आहे असा संशय पतीला आला. त्याने बऱ्याचदा पत्नीला समज दिली. एकदा तर पत्नी व तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडले. तेव्हाही दोघांना निर्वाणीचा इशारा दिला. दोन मुले असताना संसारात तिसरा कशाला असा जाबही विचारला. पत्नीचे वर्तन सुधारत नसल्याने पतीने तिच्या भावालाही याची माहिती दिली; मात्र काहीच सुधारणा होत नसल्याने संयमाचा बांध फुटला. दुसऱ्यांदा पत्नी रंगेहाथ सापडली. तिला शेतात नेऊन मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.

ज्योत्स्ना नीलेश देठे (२८, रा. पिंपरी बुटी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा मे २०१५ ला नीलेश बंडूजी देठे (३५) याच्याशी विवाह झाला होता. त्यानंतर त्या दोघांना मुलगा वैभव (८), मुलगी स्वरा (६) अशी दोन अपत्ये आहेत. सर्वकाही सुरळीत सुरू असताना ज्योत्स्नाचे गावातीलच एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. या अनैतिक संबंधातून ती बाहेर आली नाही. अखेर ज्योत्स्ना पती नीलेशच्या संतापाची बळी ठरली.

पत्नी ज्योत्स्नाचे अनैतिक संबंध सुरू आहे, असा संशय नीलेशला होता. गावातील एका सार्वजनिक कार्यक्रमात पत्नी तिच्या प्रियकराला इशारे करताना नीलेशला दिसली. तेव्हापासून त्याने पत्नीवर पाळत ठेवणे सुरू केले. तो तिच्या मागेच घरी गेला. तेथे ज्योत्स्ना व तिचा प्रियकर रंगेहाथ सापडले. नीलेशने पत्नीला तेथूनच जबर मारहाण करीत बाहेर काढले. नंतर ज्योत्स्नाच्या भावाला फोनवरून तुझ्या बहिणीला घेऊन जा नाही तर माझ्या हातून तिचा जीव जाईल, असे सांगितले.

यावरच नीलेश थांबला नाही, दुपारी त्याने ज्योत्स्नाला शेतालगतच्या धरणाच्या भिंतीवर नेऊन बेदम मारहाण केली. तेथेच ज्योत्स्ना निपचित पडली. त्यानंतर नीलेशने त्याचा लहान भाऊ नीतेश याला सोबत घेऊन बेशुद्ध अवस्थेत ज्योत्स्नाला दुचाकीवरून तिच्या भावाकडे सोडण्यासाठी निघाला.

ज्योत्स्नाचा भाऊ विठ्ठल कवडू तिखट रा. रानवड ता. राळेगाव हा बहिणीला घेण्याकरिता गावावरून निघाला. तेच मेटीखेडाजवळ बहिणीची भेट झाली. तेथून तिला राळेगाव येथील डॉ. कुणाल भोयर यांच्याकडे नेले; मात्र डॉक्टर नसल्याने तिला शासकीय रुग्णालयात न्यावे लागले. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी ज्योत्स्नाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी राळेगाव पोलिस ठाण्यात विठ्ठल तिखट यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला; मात्र घटनाक्रम वडगाव जंगल पोलिस ठाणे हद्दीतील असल्याने हा गुन्हा तेथे वर्ग करण्यात आला. वडगाव जंगलचे ठाणेदार पवन राठोड यांनी तत्काळ आरोपी नीलेश देठे व त्याचा भाऊ नीतेश देठे या दोघांनाही ताब्यात घेतले.

आरोपींना केली अटक

पत्नीचा खून करणाऱ्या नीलेश देठे व त्यानंतर त्याला सहकार्य करणाऱ्या नीतेश देठे या दोघा भावांना वडगाव जंगल पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले. गुन्ह्यातील काठी जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार पवन राठोड करीत आहेत. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले यांनी भेट दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने