सरदार पटेल महाविद्यालयात आ. अडबाले यांचा सत्कार #chandrapurचंद्रपूर:- जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा मागील अनेक वर्षापासून लढा सुरू असून या योजनेसाठी शेवटपर्यंत आम्ही लढा देऊ. जोपर्यंत ही योजना लागू होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही देत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी यापुढेही रस्त्यावर व सभागृहात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून लढा सुरू राहील असे प्रतिपादन नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी येथे बोलताना केले

चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात विधानपरिषद आमदार सुधाकर अडबाले यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला ते उत्तर देत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाचे सहसचिव तथा माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित हे होते.

यावेळी बोलताना आ. सुधाकर अडबाले म्हणाले की, मला कोणताही राजकीय वारसा नव्हता. अत्यंत गरीब कुटुंबातून मी आलो. पण आई-वडिलांकडून मी संघटन कौशल्य शिकलो. विविध संस्था व संघटनांची मला साथ लाभली. त्यामुळेच ही विजयश्री मिळविता आली. त्या सर्वांच्या अपेक्षांची पूर्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल असे आश्वासन त्यांनी दिले.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलतांना डॉ. किर्तीवर्धन दीक्षित म्हणाले की, जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांच्या कळीचा मुद्दा आहे. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुखकर जाण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी तो महत्वपूर्ण असून त्यासाठी तो मुद्दा आ.अडबाले लाऊन धरतील व त्यात ते यशस्वी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी आतापर्यंत शिक्षकांसाठी आ. अडबाले यांनी केलेल्या कार्याचा विशेषत्वाने उल्लेख करून शिक्षकांना आगामी काळात न्याय देण्यासाठी ते लढा देतील आशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमात आ. सुधाकर अडबाले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वोदय शिक्षण मंडळाचे विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, सरदार पटेल महाविद्यालयाचे विविध विभागप्रमुख, शिक्षकांच्या वतीने देखील यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. पुरुषोत्तम माहुरे, तर आभार प्रदर्शन डॉ. सतीश कन्नाके यांनी केले. कार्यक्रमाला मान्यवर, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधाताई पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, कोषाध्यक्ष मनोहर तारकुंडे, सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, एस.के. रमजान यांनीही उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत