रेल्वेतून पडला, तिथे वाहनही जाईना! Chandrapur Rajura


'त्या' रेल्वे प्रवाशाचे प्राण वाचविण्यासाठी पोलिस धावले


राजुरा:- कुणीतरी अज्ञात व्यक्ती धावत्या रेल्वेतून गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पडला, अशी माहिती विरूर रेल्वे स्टेशन येथून सहाय्यक पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांना होताच त्यांनी पोलिस हवालदार मल्लेश नर्गेवार, विकास मरकांदे, अतुल सहारे, प्रविण जुनघरे यांना माहिती देत तत्काळ घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले. मात्र घटनास्थळापर्यंत वाहन जात नसल्याने झाडाझुडुपातूनच पोलिस त्याच्या मदतीला धावले. त्या व्यक्तीला काही अंतर उचलून आणले व नंतर ट्रॅक्टरवर व पुढे रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात आले.


विरूर स्टेशनवरून सहा किलोमीटर अंतरावर दक्षिण मध्य रेल्वे लाईनच्या पोल क्रमांक १५७/२१ जवळ चालत्या रेल्वेतून रमणकुमार बिंदेश्वर प्रताप सिंग महंतो (३१) रा. सिमरा नयनपूर जि. मुजफ्फरनगर (बिहार) हा पडला. त्या परिसरात येण्या-जाण्याची सोय नसताना धाडसी पोलिस कर्मचारी काट्याकुट्याचा रस्ता तुडवत आपल्या जीवाची परवा न करता घटनास्थळी पोहचले. सुदैवाने रमणकुमार महंतो जखमी असलेला आढळला. पोलिसांनी त्याला हातावरच उचलून काही अंतरापर्यंत आणले.

मग एका ट्रॅक्टरवर त्याला ठेवून विरूर येथे आणले. तिथून रुग्णवाहिका बोलावून तत्काळ उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात आले. व्यक्तीला डोक्याला व उजव्या हाताला गंभीर दुखापत असल्याने चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत