Top News

घुग्घुस येथील वेकोलिच्या लोखंडी पूलाच्या दुरुस्तीचे काम सुरु #chandrapur


भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मागणीला यश

चंद्रपूर:- घुग्घुस शहरातील बँक ऑफ इंडियाजवळ वेकोलि परिसराला जोडणारा ३० वर्षे जुन्या लोखंडी पूलाच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मागणीला यश आले आहे.
त्याअनुषंगाने रविवार, १२ फेब्रुवारी रोजी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, वेकोलिचे उपक्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश फुलारे, माजी पं. स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गुप्ता, सचिव साजन गोहने, आकाश निभ्रड, गोकुल तुराणकर, सोनू पाटील, आस्तिक गौरकार, तुषार कटारे, सलमान खान यांनी वेकोलिच्या लोखंडी पूलाच्या दुरुस्तीच्या कामाची पाहाणी केली.

वेकोलिचा लोखंडी पूल रेल्वे प्रशासनाने गुरुवार १९ जानेवारीपासून दुचाकीच्या रहदारीसाठी बंद केला होता.
सध्या राजीव रतन चौकातील रेल्वे फाटकाजवळ निर्माणाधीन उड्डाणपूलाचे काम प्रगती पथावर सुरु आहे. त्याठिकाणी वाहतूक विस्कळीत होत असल्याने शालेय बसने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी उशीर होत आहे. तसेच रुग्णवाहिका, महामंडळाच्या बसेस अडकल्याने रुग्णांना व प्रवाश्यांना मोठा फटका बसत आहे.

वेकोलि परिसरात इंदिरानगर, गांधीनगर, सुभाषनगर, शास्त्रीनगर, शालिकरामनगर अशा मोठया वसाहती आहेत. या वसाहतीत राहणाऱ्यांसह घुग्घुस वस्तीत राहणारे दुचाकी वाहनधारक लोखंडी पूला वरून ये-जा करीत होते. परंतु पूल बंद झाल्याने त्यांना राजीव रतन चौकातून वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे घुग्घुस वस्तीतील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला.
भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी हा लोखंडी पूल नागरिकांच्या रहदारीसाठी सुरु करण्याकरिता वेकोलि अधिकारी व रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार हे गुरवार, २६ जानेवारी रोजी घुग्घुस शहरात आले असता भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वेकोलिच्या लोखंडी पूलाच्या समस्येबाबत त्यांना सांगितली व प्रत्यक्ष वेकोलिच्या लोखंडी पूलाची पाहाणी केली.
जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी तत्काळ समस्येची दखल घेत रेल्वेचे अधिकारी व वेकोलिचे महाप्रबंधक यांना निर्देश देत लोखंडी पूलाची दुरुस्ती करून लवकरात लवकर सुरु करण्यास सांगितले.

त्याअनुषंगाने वेकोलिने लोखंडी पूलाची दुरुस्ती सुरु केली आहे. त्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने