Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

विद्यार्थ्यांनो सावधान! शाळा- महाविद्यालयात दुचाकीने जाणे पडेल महागात #chandrapur


शाळा- महाविद्यालय गाठून वाहतूक पोलिसांची कारवाई; २९ विद्यार्थ्यांवर ठोठावला दंड


चंद्रपूर:- अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले होते. मात्र, तरीसुद्धा अनेक लहान मुले हातात दुचाकी घेऊन भरधाव जाताना दिसून येत होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी चंद्रपुरातील थेट शाळा गाठून अल्पवयीन मुले व विनापरवाना वाहन बाळगणाऱ्या २९ मुलांवर एक लाख ४० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. काही कारवाईत तर पालकांना व मुलांनाही दंड ठोठावला आहे.

वाढत्या अपघाताला आळा घालण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविली जात आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलांना वाहन देऊ नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले होते. पालकांनी याकडे कानाडोळा केला. परिणामी, अनेक अल्पवयीन मुले बेदरकारपणे दुचाकी चारचाकी विनापरवाना सुसाट पळवताना दिसून येतात. त्यामुळे वाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या नेतृत्वातील पथक जनता कॉलेज, विद्यानिकेत स्कूल गाठून ज्या विद्यार्थ्यांनी दुचाकी आणली आहे. त्यांची चौकशी केली. यावेळी अल्पवयीन मुले व विनापरवाना आढळून आलेल्या २९ विद्यार्थ्यांवर कारवाई करून एक लाख ४० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

शाळा- महाविद्यालयात होणार तपासणी

शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने घेऊन येतात. त्यात काही अल्पवयीन मुलेही असतात. तर अनेकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतो. तरीसुद्धा ते बेदरकारपणे वाहन चालवतात. आता वाहतूक पोलिसांनी अशांवर लक्ष केंद्रित केले आहे. थेट शाळा-महाविद्यालये गाठून तेथे अल्पवयीन चालक व विनापरवाना चालकाकडे वाहन आढळून दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई तर वडिलांवर गुन्हा दाखल होणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी कळविले आहे.

आता थेट गुन्हा दाखल होणार

अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळून आल्यास दहा हजार रुपये दंड व पालकांवर थेट गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे; परंतु, पहिल्या टप्प्यात आम्ही केवळ दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र, आता पुन्हा अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळून आल्यास पालकांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देऊ नका. प्रवीणकुमार पाटील, वाहतूक पोलिस निरीक्षक, चंद्रपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत