चंद्रपूर:- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी आज विधिमंडळात सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या विकासाला गती देणारा असून समाजातील सर्वच घटकांना दिलासा आणि लाभ देणारा हा अर्थसंकल्प आहे.
कृषी, सिंचन, महिला, आरोग्य, मनुष्यबळ विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, दळणवळण, पर्यटन, सांस्कृतिक आणि उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रासाठी भरीव तरतूद करून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पंचामृत सुत्रानुसार सर्व घटक, सर्व विभागांना न्याय देत सर्वसामान्यांच्या सरकारचा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आज सादर केला. अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी व्यक्त केली.
आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या वित्तीय मर्यादेत वाढ करत विमा संरक्षण १.५० लाखांहून ५ लाख करण्यात आले. यासाठी नवीन २०० रुग्णालयांचा यामध्ये समावेश करत मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ २.५० लाखांहून ४ लाखांपर्यंत केल्या गेले आहे. यासोबतच राज्यभरात सुमारे ७०० नविन 'स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'च्या माध्यमातून विनामूल्य वैद्यकीय सेवा देऊन महाराष्ट्रातील गोरगरिबांचे आरोग्य अबाधित ठेवण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकारच्या नेतृत्वात आता होणार आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभामध्ये देखील राज्य सरकारकडून आता २ लाखापर्यंत वाढ करण्यात आली आहे.
याबरोबरच निराधारांच्या मानधनात वाढ करून १००० रु. च्या १५०० रूपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारला अतिरिक्त २४०० कोटी रुपयांचा भार उचलावा लागणार आहे. यासोबतच हे अर्थसहाय्य प्रत्येक महिन्याच्या पहिल्याचं आठवड्यात नियमित प्रदान करण्यात येणार आहे.
तसेच “सारे काही महिलांसाठी” म्हणत अभिनव अशी लेक लाडकी योजना राबविण्यात येणार असून राज्यातील महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेमध्ये तिकिट दरात सरसकट ५०% टक्के सुट देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पातून राज्य सरकारने घेतला आहे. चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार करण्याची घोषणा देखील या माध्यमातून करण्यात आली आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना, महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण अवलंबिल्या जाणार असून “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या अभियानाअंतर्गत ४ कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार करण्यात येणार आहे. सूक्ष्म सिंचनासाठी राज्यात पुन्हा एकदा जलयुक्त शिवार योजना सुरू करण्यात येणार असून कौशल्य विकासच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती करत महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचा संकल्पच या सर्वसमावेशी अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे.
पुढे बोलताना, या सर्वसमावेशक अर्थसंकल्पात अंत्योदयाचा पुरेपूर विचार करण्यात आला असून धनगर समाजासाठी १००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, यासोबतच विविध विकासात्मक योजनांसह १० हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बार्टी, सारथी, महाज्योती, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ इ. अशा सर्वच आर्थिक विकास महामंडळांना भरीव निधी देण्याची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याने सर्व घटकांच्या विकासाची मुहुर्तमेढ रोवल्या गेली आहे.
आदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी २५० शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा करणार असल्याचे सांगत ना. फडणवीसांनी अनुसूचित जमातीच्या १०० विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी अधिछात्रवृत्ती देण्याची घोषणाही ना. फडणवीसांनी आज केली. याबरोबरच अल्पसंख्याकांसाठी महिलांच्या आर्थिक विकासाला चालना देण्याकरिता १५ जिल्ह्यात ३००० बचतगटांची निर्मिती करण्यात येणार असून उच्च शिक्षण घेणार्यांना २५,००० वरून ५०,००० पर्यंत शिष्यवृत्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून येत्या काळात वीस हजार पदे ही भरण्यात येणार आहेत. एकुणच शाळांचे बांधकाम, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, शाळांचे अनुदान, शिक्षण सेवकांचे मानधन, मोफत गणवेश, शालेय स्तरावर कौशल्य प्रशिक्षण वर्ग सुरू करणे व देशातील मुलींची पहिली शाळा विकसित करणे असा शिक्षण क्षेत्रातही क्रांती घडवणारा आजचा अर्थसंकल्प असून राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने सहकार्य करणारा हा अर्थसंकल्प आहे. असेही ते म्हणाले.