Chandrapur accident News: चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात; ट्रक-पिकअपमध्ये समोरासमोर धडक

Bhairav Diwase

गोंडपिपरी:- चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील झरन गणपूर फाट्यावर शुक्रवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. सूरजागड येथून आयरन घेऊन येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या महिंद्रा पिकअपला जोरदार धडक दिली. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.


प्राथमिक माहितीनुसार, सुरजागड येथून भरधाव वेगाने आयरन भरलेल्या ट्रकने झरन गणपूर फाट्याजवळ समोरून येणाऱ्या महिंद्रा पिकअपला समोरासमोर धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की पिकअपचा चक्काचूर झाला. अपघातात पिकअपमधील तीन जण गंभीर जखमी झाले होते. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले; या भीषण अपघातात संदीप कुलमेथे आणि रमेश वाढई या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गणेश मडावी हा गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातामुळे गोंडपिपरी-बल्लारपूर मार्गावर काही काळासाठी वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक व पिकअप बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, अपघाताचा तपास पोलिस करीत आहेत.

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वेगावर नियंत्रण गमावल्यामुळे झालेल्या या भीषण अपघाताने पुन्हा एकदा महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.