वन मॅन शो! गोलंदाजाचा कारनामा, 10 विकेट्स घेत रचला इतिहास #chandrapur #cricket #10wicket

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सेंट मायकल हायस्कूलच्या क्रीडांगणावर आयोजित आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेत गोंदिया विरुद्ध चंद्रपूर या सामन्यात चंद्रपूर जिल्हा क्रिकेट संघाच्या मेहुल शेगमवार या फिरकी गोलंदाजाने ७.१ षटकात २२ धावा देत १० गडी बाद केले. आजवरच्या सामन्यात हा एक विक्रम आहे. विशेष म्हणजे, सातपैकी चार षटके त्याने निर्धाव टाकली.

गेल्या आठवडाभरापासून नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने चंद्रपूर व वर्धा या दोन जिल्ह्यांत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर येथे आयोजित या स्पर्धेत नागपूर विभागातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर येथील संघ सहभागी झाले आहेत.

शुक्रवारी सकाळी झालेल्या चंद्रपूर विरुद्ध गोंदिया या दोन जिल्ह्यांच्या सामन्यात चंद्रपूर संघाच्या मेहुल शेगमवार या गोलंदाजाने अवघ्या सात षटकांत २२ धावांच्या मोबदल्यात गोंदिया संघाचे दहा गडी बाद केले.

आजवर एकाच डावात दहा गडी बाद करण्याचा विक्रम कुणाच्याही नावावर नाही. प्रथमच मेहुल शेगमवार याने या विक्रमाची नोंद केल्याचे सांगितले. गोंदियाचा संघ अवघ्या ७६ धावांवर बाद झाला. चंद्रपूर संघाने गोंदिया संघावर सहज विजय मिळवला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)