वर्षभरात 16 प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई #chandrapur #FoodandDrugAdministration #action


एकूण 24 लक्ष 33 हजारांचा मुद्देमाल जप्त


चंद्रपूर:- महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, खर्रा, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखु इत्यादी अन्नपदार्थांच्या निर्मिती, साठा, विक्री, वितरण, वाहतूक यावर बंदी घातली आहे. सर्वसाधारण जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी अधिसूचनेतील तरतुदींची कडक अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. गत वर्षभरात (1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023) एकूण 16 प्रतिबंधित अन्नपदार्थ (खर्रा, सुगंधित तंबाखु, सुगंधित सुपारी) विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून एकूण 24 लक्ष 33 हजार 114 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गत आठवड्यात अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने व्याहाड (बु), ता. सावली येथील राहूल पुरुषोत्तम खोब्रागडे, रा. द्वारा मेहबुब खा पठान यांच्याकडून प्रतिबंधित अन्नपदार्थाचा एकूण 117 कि. ग्रॅ. (किंमत 1 लक्ष 15 हजार) मुद्देमाल जप्त केला. तसेच सदर साठ्याचे पुरवठादार विनय गुप्ता, रा. गोकुल नगर, गडचिरोली व राहूल पुरुषोत्तम खोब्रागडे, रा. द्वारा मेहबुब खा पठान यांच्याविरुध्द सावली पोलिस स्टेशन येथे प्रथम खबरी अहवाल दिला आहे.

तर 28 मार्च 2023 रोजी मे. बेले पान मटेरियल व किराणा, भानापेठ वार्ड, चंद्रपूर यांच्याकडून एकूण 4.32 कि. ग्रॅ. (किंमत 6420 रुपये) व मे. पवन ट्रेडर्स, सुनिल खियानी यांचे गोडावून, भानापेठ वार्ड, चंद्रपूर यांच्याकडून एकूण 3.65 कि. ग्रॅ. (किंमत 4844 रुपये) मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत प्रेमकुमार बाबूरावजी बेले व पवन अशोक जवाहरमलानी तसेच वसीम झिमरी (पुरवठादार) यांचे विरुध्द शहर पोलिस स्टेशन, चंद्रपूर येथे प्रथम खबरी अहवाल देण्यात आला आहे.

राजुरा येथील मे. गणेश प्रोव्हिजन, नेहरु चौक, मे. जलाराम किराणा स्टोअर्स, आसीफाबाद रोड, व मे. महाराष्ट्र पान मटेरियल, गडचांदूर रोड येथे तपासण्या करण्यात आल्या असून तपासणी दरम्यान कोणताही प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आढळून आला नसल्याचे सहाय्यक आयुक्त (अन्न) नितीन मोहिते यांनी कळविले आहे

जिल्ह्यात कोणीही प्रतिबंधित अन्न पदार्थ जसे खर्रा, सुगंधित तंबाखु, सुगंधित सुपारी संबंधित कोणताही व्यवसाय केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच अन्नपदार्थाच्या दर्जाविषयी कोणतीही माहिती / तक्रार / सुचना असल्यास एफडीए हेल्पलाईन क्र. 1800222365 यावर संपर्क करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या