Top News

ग्रामसेवकाच्या पत्नीला सर्पदंश, रुग्णालयात नेताना कारचा अपघात; आई-सासूचा जागीच मृत्यू #chandrapur #gadchiroli #accident


गडचिरोली:- सर्पदंश झाल्याने पत्नीला दवाखान्यात नेताना ग्रामसेवकाच्या कारला अपघात झाला. यात आई व सासू यांचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. तालुक्यातील पाेहर नदीलगत १८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ही घटना घडली. या घटनेने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

जनाबाई बाबूराव डोनारकर (५५), शालूबाई देविदास दहागावकर (५२) अशी मृत महिलांची नावे आहेत. हेमंत बाबूराव डोनारकर (रा. अहेरी) हे ग्रामसेवक असून, गावातच त्यांची सासरवाडी आहे. १८ एप्रिल रोजी घरकाम करताना त्यांची पत्नी स्नेहा हिला सापाने चावा घेतला. हेमंत हे पत्नी स्नेहाला घेऊन कार क्रमांक (एमएच ३३, एसी - ७८७८)मधून गडचिरोली जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी निघाले. यावेळी सोबत आई जनाबाई डोनारकर व सासू शालूबाई दहागावकर यांनाही घेतले.

दरम्यान, रात्री ९ वाजता कार चामोर्शी - गडचिरोली मार्गावरील पोहर नदीजवळ पोहोचली. तेथे रस्त्याचे काम सुरू आहे. यावेळी खड्ड्यात आदळून कार उलटली. यात चौघेही जखमी झाले. नागरिकांनी त्यांना चामोर्शी येथे प्रथमोपचारासाठी हलविले. तेथे जनाबाई डोनारकर यांनी प्राण सोडले. त्यानंतर गडचिरोलीला नेताना वाटेत शालूबाई यांचाही मृत्यू झाला. दरम्यान, स्नेहावर नागपूर येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. परंतु अद्याप प्रकृती बद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. हेमंतला किरकोळ मार लागला आहे.

पतीवर गुन्हा दाखल

कार स्वत: हेमंत डोनारकर हे चालवत होते. आई - सासूच्या अपघाती मृत्यूस व स्वत:सह पत्नीच्या जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याने त्यांच्यावर चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पो. नि. राजेश खांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राकेश टेकाम अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने