सिरोंचा:- सिरोंचा तालुक्यातील असरअली ठाणे हद्दीतील कोर्ला गावातून ५ एप्रिलला खळबळजनक घटना समोर आली. दारु पिऊन सतत त्रास देणाऱ्या पतीचा मुलीच्या सहाय्याने पत्नीने डोक्यात मुसळ मारुन काटा काढला. यानंतर पळून गेलेल्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
शंकर लस्मया दुर्गम (४०,रा. कोर्ला ता. सिरोंचा) असे मयताचे नाव आहे, पत्नी सुशीला (३५) हिच्यासह दोन मुली व एक मुलगा असे हे पाच जणांचे कुटुंब मोलमजुरी करुन राहत होते. शंकर दुर्गम यास दारुचे व्यसन जडले होते. दारु पिऊन तो सतत पत्नीला त्रास द्यायचा. ४ एप्रिलला दुपारी साडेबारा वाजता नशेत तो घरी गेला. पत्नीकडे पैशांची मागणी केली. पत्नीने नकार दिल्यावर त्याने तिच्याशी वाद घातला. यावेळी संतापलेल्या सुशीला हिने अल्पवयीन मुलीला शंकरचे हात पकडायला लावले व डोक्यात लाकडी मुसळ घातले. घाव वर्मी बसल्याने शंकर यांचा मृत्यू झाला.
यानंतर पातागुडम पोलिस मदत केंद्रात या घटनेची माहिती झाली. उपनिरीक्षक बालाजी लोसरवार यांनी घटनास्थळी भेट दिली. मयत शंकरचे वडील लस्मया पोचया दुर्गम यांच्या फिर्यादीनुसार सुशीला व अल्पवयीन मुलगी या मायलेकीवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. ५ एप्रिल रोजी सुशीला शंकर दुर्गमला पोलिसांनी अटक केली आहे.