'हरी तुझ्या खेळाचे भय वाटे...' भारत राजगडेंचे स्वर झाले मुके, चाहत्यांना धक्का #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase


गडचिरोली:- 'आमुचा तू आमुचा तू सवंगडी.. परी करीशी तू आपली खोडी.. हरी तुझ्या खेळाचे भय वाटे..' अशा भजनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या भारत राजगडे यांचे स्वर मुके झाले आणि त्यांचे हजारो चाहते शोकसागरात बुडाले. भारत राजगडे ( ३७) यांच्यासह पत्नी अंकिता (३०) तसेच देव्यांशी (५) व मनस्वी (३) या चिमुकल्यांचा कुरखेडा- देसाईगंज मार्गावरील तुळशीफाटा येथे २४ एप्रिलला सायंकाळी वीज कोसळून मृत्यू झाला.


सासरवाडीतील लग्नसमारंभ आटोपून दुचाकीवरून परतताना पाऊस सुरु झाल्याने ते झाडाखाली थांबले अन तेथेच या सर्व निष्पाप कुटुंबाला मृत्यूने गाठले. भारत राजगडे यांनी भजनी मंडळ स्थापन करून विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत बक्षीसे पटकावली होती. शिवाय नाटकांमध्ये गायनाचे कामही ते करत.


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांची भजने गाऊन त्यांनी देसाईगंज तालुक्यासह परिसरात नावलौकिक मिळवला होता. त्यांच्यासह पत्नी, दोन मुलींचा एकाचवेळी मृत्यू झाल्याची घटना समजल्यावर चाहत्यांना धक्का बसला. अनेकांनी देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी गायलेल्या भजनांच्या चित्रफिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. त्यांच्या जाण्याने रसिकांनी शोक व्यक्त केला.