थकीत तेंदूपत्ता रक्कमेची वनमंत्र्यांनी घेतली दखल #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase

संबंधित कंत्राटदारांवर कार्यवाही संदर्भात दिले निर्देश

गडचिरोली:- शासनाला कोट्यावधीचा महसूल तेंदूपत्ता हंगामातून प्राप्त होत असतांना अहेरी विभागातील चार तालुक्यातील अनेक गावात तेंदू संकलन करणाऱ्या मजूरांना संबंधित कंत्राटदारांकडून 20 कोटीहून अधिकची रक्कम थकीत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली होती. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी थेट वनमंत्र्यांना निवेदन सादर करीत सदर थकीत रक्कम संबंधित तेंदू मजूरांना देऊन मजूरांची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर कार्यवाहीची मागणी केली होती. याची दखल थेट वनमंत्र्यांनी घेतली असून यासंदर्भात योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी प्रधान सचिव (वने) यांना दिले आहे. वनमंत्र्यांच्या या सक्तीच्या आदेशामुळे थकित तेंदू मंजूरांमध्ये आशेचे किरण दिसत आहेत.

अहेरी उपविभागांतर्गत येत असलेल्या एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी या तालुक्यातील अनेक ग्रामसभांचे 2017-2022 या पाच वर्षाच्या तेंदू हंगामातील तेंदू मजूरांची तब्बल 20 कोटीहून अधिकची रक्कम कंत्राटदारांकडे थकित आहे. यामध्ये विशेषत: एकटया सुरजागड इलाख्यातील गट्टा, गर्देवाडा, जांभिया, वांगेतूरी, जव्हेरी या युनिटमधील 6 कोटी 30 लाखांची रक्कम संबंधित कंत्राटदार देणे बाकी आहे. यासोबतच अहेरी तालुक्यातील कमलापूर, मांड्रा, दामरंचा कुयमपल्ली, किष्टापूर, गोविंदगाव, रेगूलवाही, कोंजेड यासह जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील अनेक गावातील तेंदू मजूरांची मजूरी थकित असल्याने सदर तेंदू मजूर आर्थिक अडचणीत आहेत. या मजूरांना थकित रक्कम तत्काळ अदा करुन तेंदू मजूरांची फसवणूक करणा-या संबंधित कंत्राटदारांवर उचित कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे निवेदनातून केली होती.

या निवेदनाची वनमंत्र्यांनी दखल घेतली असून यासंदर्भात प्रधान सचिव (वने), महसूल व वनविभाग, मंत्रालय यांना आदेश जाहीर करीत सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची निर्देश दिले आहेत. वनमंत्र्यांच्या या आदेशामुळे अहेरी उपविभागातील थकित रक्कम असलेल्या तेंदू मजूरांसह जिल्हाभरातील थकित तेंदू मजूरांना न्याय मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.