कोरपना:- गडचांदूरकडून आदिलाबादकडे जाणार्या ट्रकचा टायर फुटल्याने समोरून येत असलेल्या तेलंगणा परिवहन विभागाच्या बसला जोरदार धडक बसली.
यात ट्रकचालक गंभीररित्या जखमी झाला. ही घटना कोरपना-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील कातलाबोडी फाटा येथे बुधवार, 12 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळबंली होती.
कोरपना-गडचांदूरकडून केटीसी कंपनीचा मालवाहू ट्रक (एमएच 34 पीजी 4166) आदिलाबादकडे जात होता. यावेळी कातलाबोडी फाट्याजवळ या ट्रकचा टायर फुटला. त्यामुळे अनियंत्रित झालेल्या ट्रकची आदिलाबादकडून चंद्रपूरकडे जाणार्या तेलगंणा परिवहनच्या बसला (एपी 01 झेड 0083) समोरासमोर जोरदार धडक बसली. यात ट्रकचालकाच्या पायाला गंभीररित्या दुखापत झाली. त्याच्यावर कोरपना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले. बसच्या चालक किरकोळ जखमी झाला. बसमधील प्रवासी सुखरूप असून, सुदैवाने जीवित हानी झाली नाही. अपघातानंतर चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत रस्ता मोकळा करून एकेरी वाहतूक सुरू केली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार संदीप एकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी प्रकाश राठोड, मेजर नामदेव पवार करीत आहे.