प्रेयसीच्या नावे फेसबुकवर पत्र पोस्ट करून विवाहित पुरुषाने स्वत:ला संपविले #chandrapur #mul #suicide


मुल:- विवाहबाह्य संबंधांतून आलेल्या नैराश्यापोटी एका विवाहित युवकाने फेसबुकवर आपल्या प्रेयसीच्या नावे पत्र पोस्ट केले आणि नैराश्यातून आपण आपले जीवन संपवित आहे, असे सांगत गळफास घेत आत्महत्या केली. गुरुवारी राजोली येथे घडलेल्या या घटनेने गावात चांगलीच खळबळ उडाली आहे.

विकास लाकडे (३८) रा. राजोली असे आत्महत्या केलेल्या विवाहित युवकाचे नाव आहे. राजोली येथील वॉर्ड नं. ५ मधील रहिवासी विकास लाकडे हा पत्नी व दोन मुलांसह राहत होता. देसाईगंज वडसा येथील एका नाट्य मंडळात ऑर्गन वाजविण्याचे तो काम करीत होता. दरम्यान, कापड व्यवसाय करणाऱ्या गावातीलच एका विवाहित युवतीशी त्याचे सूत जुळले. नाट्य मंडळात ऑर्गन वाजविण्याचे काम करताना नाटकाचा प्रयोग आणि सरावाच्या निमित्ताने विकास बहुतांशी वडसा देसाईगंज येथे राहत होता. दरम्यान कपडे विकण्याचा व्यवसाय करणारी ही विवाहित युवती खरेदीच्या निमित्ताने अनेकदा वडसा देसाईगंज येथे जात असायची.

त्यादरम्यान विकासची त्या युवतीशी वारंवार भेटी होत होत्या. भेटीचे रूपांतर प्रेमात आणि त्यानंतर विवाहबाह्य संबंधात झाले. दोघांच्याही गाठीभेटी वाढू लागल्यानंतर दोघांनीही एकत्रित राहण्याचा निर्धार केला. मात्र कुटुंब आड येत असल्याने विकास विवंचनेत असायचा. दरम्यान, दोघांच्याही विवाहबाह्य संबंधांची चर्चा गावात व कुटुंबात रंगू लागल्यामुळे विकासने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. बुधवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास त्याने स्वतःच्या फेसबुकवरून प्रेयसीच्या नावाने पत्र पोस्ट करून आपण नैराश्यातून जीवन संपवित असल्याचे जाहीर केले.

विकासने फेसबुकवर अशी पोस्ट टाकल्यामुळे त्याच्या मित्रपरिवारात खळबळ माजली. फेसबुकवरील पत्र वाचल्यानंतर अनेक मित्रांनी विकासच्या भ्रमणध्वनीवरून वारंवार संपर्क साधला. मात्र संपर्क होत नव्हता. शेवटी मोबाइलमधील लोकेशनच्या आधारे शोध घेतला असता गावापासून अंदाजे १ कि.मी. अंतरावर असलेल्या गंगाधर लाकडे यांच्या शेतातील झाडाला विकासने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे दिसून आले.

याची माहिती पोलिस पाटील यांच्या माध्यमातून पोलिस स्टेशन मूल येथे देण्यात आली. लगेच ठाणेदार सुमित परतेकी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि पुरुषोत्तम राठोड, पोउनि गेडाम यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी राजेश शेंडे सहकाऱ्यांसह करीत आहेत.
तुर्तास या घटनेबाबत मर्ग दाखल केला आहे. फेसबुकवरील पोस्टबाबत अद्याप तपास करण्यात आलेला नाही. तपासानंतर पुढे काय करायचे, हे ठरविले जाईल.
सुमित परतेकी, ठाणेदार, मूल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत