एकदा आमदार, खासदार, नगरसेवक झाले की आयुष्यभराची कमाई करण्याची संधी मिळते असे म्हटले जाते. पण असेही नेते आहेत जे राजकीय क्षेत्रात प्रवेश करून उच्च पदावर जाऊन देखील त्यांचे पाय जमिनीवर टिकून आहेत. त्यांचे कुटुंब देखील साधेपणाने राहून आपला पारंपरिक व्यवसाय जिद्दीने सुरु ठेवून आहेत. असेच एक विदर्भातील आमदार आहेत. त्यांची आई आजही रस्त्यावर बसून बांबूच्या टोपल्या विकते.
चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या त्या मातोश्री आहेत. गंगुबाई जोरगेवार उर्फ अम्मा.. अम्मांच वय 80 वर्ष आहे. मात्र आपला मुलगा आमदार होऊन देखील त्या माउलीला त्याचा गर्व नाही की फुशारक्या मारणे नाही. चंद्रपूर शहरात सध्या माता महाकालीची यात्रा सुरु आहे. या यात्रेत रस्त्याच्या कडेला बसून अम्मा बांबूच्या टोपल्या विकतात.
अम्मा चंद्रपूरच्या मुख्य बाजारपेठेत म्हणजे गांधी चौकात वर्षभर रस्त्याच्या कडेला बसून बांबूच्या वस्तू विकतात. मात्र महाकालीच्या यात्रेदरम्यान चांगली विक्री होते. म्हणून यात्रेत देखील न चुकता आपला व्यवसाय थाटतात. देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चंद्रपूरच्या बांबूच्या टोपल्या देण्यात त्यांना आनंद वाटतो.
बांबू ताटवे, टोपल्या याचा पिढीजात धंदा करणारे जोरगेवार कुटुंब आजही आपल्या व्यवसायावर ठाम आहे.आमदार किशोर जोरगेवार यांना देखील आपल्या आईचा अभिमान आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर जोरगेवार शिंदे गटामध्ये सामील झाले. त्यावेळी त्यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप करण्यात आला. मात्र आईच्या कष्टामुळे मी या पदापर्यंत पोहोचलोय असे किशोर जोरगेवार म्हणतात.