......अन् तीन हजार आंदोलकांनी अख्खी रात्र रस्त्यावर झोपून काढली! #Pombhurna #chandrapurपोंभुर्णा:- मंगळवारी जिल्हाचे तापमान ४३.६ अंश सेल्सिअस होते. अंगाची लाही लाही करणाऱ्या या तापमानात हजारो आदिवासी बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पोंभुर्णा शहरातील बसस्टॉप चौकात रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन सुरू आहे.


५० टक्के आदिवासी बहुल असलेल्या गावांमध्ये पेसा कायदा लागू करावा, ५० वर्षांपासून कसत असलेल्या वनजमिनी आदिवासींना देण्यात याव्या, सुरजागड येथील अवजड वाहतूक बंद करावी, इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्यात यावा आणि वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीचा मोबदला वाढविण्यात यावा, अशा अनेक मागण्या घेऊन आदिवासींचे हे आंदोलन सुरू आहे.


मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर आदिवासी ठाम आहेत. या आंदोलनामुळे पोंभूर्णा-मूल आणि गोंडपिंपरी-मूल अशी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मंगळवारची अख्खी रात्र आंदोलनकर्त्यांनी आंदोलनस्थळीच झोपून आंदोलन अधिक तीव्र केले आहे. बुधवारी पहाटेपासून आंदोलनाला परत सुरुवात झाली आहे. यावेळी आंदोलनकर्ती शालू केमदास तलांडे यांची प्रकृती बिघडली होती. मात्र त्यांनी दवाखान्यात जाण्यास नकार देत शेवटच्या श्वासापर्यंत आंदोलन करण्याची रोखठोक भुमिका यावेळी घेतल्याने प्रशासनाने धसका घेतला आहे.

जिल्हा आणि जिल्हा बाहेरील आदिवासी बांधव पुन्हा जमण्याची शक्यता आहे. यावेळी पोंभुर्णा शहरातील आंबेडकर चौकातही आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. या मार्गाने होणारी सर्व वाहतूक त्यांनी बंद केली होती. मात्र काही वेळानंतर ती सुरू केली. बस स्टॉप चौकातील मुख्य मार्ग बंद असल्याने सामान्य नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथील नागरिकांनी ये जा करण्यासाठी रस्त्याची एक बाजू सुरू करण्याची विनंती गावकऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना केली आहे. आंदोलकांनी उन्हापासून महिला व चिमुकल्यांना वाचविण्यासाठी बस स्टॉप चौकात मंडप टाकून सावली केली आहे.अजूनही बस स्टॉप चौकातील मुख्यस्थळी आंदोलन सुरु आहे. आदिवासी नेते जगन येलके आणि देवाडा खुर्दचे सरपंच विलास मोगरकार हे आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे. न्याय मिळाल्यानंतरच आंदोलन मागे घेऊ, अशी त्यांची भूमिका आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत