चकमकीत ३ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान #chandrapur #gadchiroli #Bhamragarh


भामरागड:- भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम व पेरमिली पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या केडमारा जंगलात रविवारी संध्याकाळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी ३ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. ठार झालेल्या नक्षल्यांमध्ये पेरमिली दलम कमांडर बिटलू मडावी, विभागीय समिती सदस्य वासू आणि अहेरी दलमचा उपकमांडर श्रीकांत यांचा समावेश आहे.

हेही वाचा:- महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत घडला होता रक्तपात

मन्नेराजाराम परिसरातील केडमारा जंगलात नक्षलवाद्यांचा वावर असल्याचे कळताच त्या भागात पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान सुरू केले होते. अशातच ३० एप्रिलला संध्याकाळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी जंगलात पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये पेरमिली दलम कमांडर बिटलू मडावी, विभागीय समिती सदस्य वासू आणि अहेरी दलमचा उपकमांडर श्रीकांत यांचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यांच्याकडून काही शस्त्रे ताब्यात घेतली आहेत. श्रीकांतचा समावेश विसामुंडी व आलेंगा येथील बांधकाम साहित्याची जाळपोळ आणि मर्दहूर येथील साईनाथ नरोटे नामक युवकाच्या हत्येत होता, अशी माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत