‘ते’ मोठे लोक, आम्ही त्यांच्यापुढे टिकू शकणार नाही; वडेट्टीवारांची गांधीगिरी… #chandrapur


चंद्रपूर:- महाराष्‍ट्रातील कॉंग्रेसचे एकमेव चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी माजी मंत्री आणि ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांना चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्याचे आव्हान दिले. त्यावर ते मोठे लोक आहेत, स्वतः खासदार आणि त्यांची पत्नी आमदार आहे. आम्ही त्यांच्यापुढे टिकू शकणार नाही, अशी गांधीगीरी करणारे उत्तर आमदार वडेट्टीवार यांनी दिले.

हेही वाचा:- महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत घडला होता रक्तपात

चंद्रपूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आधी माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत युती करून चंद्रपुरात बाजार समितीमध्ये खासदार बाळू धानोरकर यांना पराभवाची चव चाखायला लावली, असे आरोप झाले. त्यानंतर आम्ही मुनगंटीवारांसोबत युती केलीच नाही आणि बाळू धानोरकर आमच्याच पक्षाचे आहेत. त्यांच्या पराभवासाठी आम्ही काम केले, हा आरोप चुकीचा आहे, अशी प्रतिक्रिया आमदार वडेट्टीवार यांच्या समर्थकांनी (ता. २९) दिली होती.

प्रतिक्रिया देताना खासदारांनी त्यांच्या गावातील बाजार समिती तरी राखायला हवी होती, असा चिमटाही वडेट्टीवार समर्थकांनी घेतला होता. त्यानंतर (ता. ३०) खासदार बाळू धानोरकर चांगलेच भडकले आणि त्यांनी वडेट्टीवारांना चंद्रपुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. ते तसे करणार नसतील तर मी स्वतः त्यांच्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवेन आणि जिंकूनही दाखवेन, असेही आव्हान खासदार धानोरकरांनी दिले. त्यांच्या या आव्हानावर आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

यासंदर्भात ‘सरकारनामा’शी बोलताना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, आम्ही खासदारांवर टीका केलेली नाही. ते खासदार आहेत, त्यांच्या पत्नी आमदार आहेत. त्यांच्या कार्याने आणि एकंदरीतच ते मोठे नेते आहेत. आम्ही त्यांच्यापुढे टिकू शकत नाही. त्यामुळे आम्ही आव्हान स्वीकारू शकत नाही. आम्ही त्यांच्यावर कुठलीही टिका केलीही नाही. त्यांच्या आगामी निवडणुकांमध्ये त्यांना भरभरून यश मिळो, अशीच आमची प्रार्थना आहे.

खासदार धानोरकर सर्व दृष्टीने परिपूर्ण आहेत. आमच्यासारख्या लहान माणसाचा त्यांच्यापुढे टिकाव लागणे अवघड आहे. त्यांचे आव्हान स्वीकारण्यायेवढे आम्ही मोठे नाही. त्यांचे आव्हान आम्ही स्वीकारणार नाही. कारण ते आमच्याच पक्षाचे आहेत. आम्ही कशाला त्यांचे आव्हान स्वीकारायचे, असा प्रश्‍न वडेट्टीवार यांनी केला. चंद्रपूर लोकसभा लढण्याच्या खासदार धानोरकर यांच्या आव्हानावर, कुणाला कुठून उमेदवारी द्यायची, हे पक्षश्रेष्ठी ठरवतात. आम्ही ठरवत नाही, तो आमचा अधिकारही नाही, असे म्हणत आमदार वडेट्टीवार यांनी पक्ष शिस्तीचे महत्वही अधोरेखित केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत