मित्रांसोबत नदीमध्ये मौज करण्यासाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू #chandrapur #gadchiroliगडचिरोली:- देसाईगंज शहरातील जवाहर वार्ड येथील रहिवासी अरहान शब्बिर शेख वय १५ हा मुलगा आपल्या मित्रांसह वैनगंगा नदीमध्ये पोहाण्याकरिता गेला असता खोल पाण्यात बुडून अरहान चा मृत्य झाला.

देसाईगंज शहरातील तीन मुले दिनांक ७ मे ला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी वैनगंगा नदीमध्ये पोहण्याकरिता गेले असता नदीवरील रेल्वे पुलाच्या खाली मुलांनी पाण्यात उतरून पोहण्यास सुरुवात केली व यातील मृतक अरहान हा पाण्यात पोहत समोर जात होता. परंतु काही अंतरावर तो खोल पाण्यात गेला असता त्याला पोहणे अशक्य होत असल्याचे बघताच सोबतच्या दोन मुलांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु पाणी खोल असल्याने त्याला वाचविणे शक्य झाले नाही. या घटनेने दोन्ही मुलं घाबरून घरी पळत आले. घडलेल्या घटनेची माहिती त्यांनी कोणाजवळही सांगितली नाही.

मुलगा घरी न आल्याने अरहान च्या पालकांनी त्याचा शोध सुरू केला. त्याचा मित्रांना विचारणा केली असता रात्री उशिरा दोन्ही मुलांनी संपूर्ण हकीकत सांगितली. रात्री अंधार असल्याने शोध घेणे शक्य नसल्यामुळे, पालकांनी सकाळी पोलिसांना माहिती देऊन शोध सुरू केला. यावेळी रेल्वे पुलाच्या चौथ्या खांबाजवळ पाण्यात शव आढळून आला. पोलिसांनी शव हस्तगत करून उत्तरीय तपासणी ग्रामीण रुग्णालयात पाठविला असून पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत