कोरपना:- कोरपना तहसील अंतर्गत येणाऱ्या ईरइ-भोयगाव नदीपात्रातून मोठ्याप्रमाणात वाळूचा उपसा सुरू आहे. दररोज रात्रीच्या सुमारास न चुकता 8 ते 10 ट्रॅक्टर वाळू भरून बोरगाव मार्गे कवठाळा व इतर ठिकाणच्या गावात जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कवठाळा येथील एक वाळू तस्कर त्याच्याकडे असलेले अंदाजे 3 ते 4 ट्रॅक्टर आणि भोयगाव व इतर ठिकाणाचे अंदाजे 4 ते 5 असे जवळपास 8 ते 10 ट्रॅक्टर स्वतःच्या हिंमतीवर ठेवून गेल्या कित्येक महिन्यापासून ईरइ-भोयगाव नदीपात्रातून वाळूचा उपसा करीत आहे. वाळूचा उपसा करण्यासाठी याने चक्क कवठाळा येथील एक जेसीबी मशीन भाडे तत्त्वावर घेतली आणि रात्रभर बिनधास्तपणे वाळूचा उपसा करून या सर्व ट्रॅक्टरद्वारे आणून जवळपासच्या खेडेगावात चढ्या दराने विक्री करत असल्याची माहिती आहे.
या प्रकरणात आश्चर्य म्हणजे एकच की, दररोज रात्रभर एकामागे एक अवैधरित्या वाळू भरून ट्रॅक्टर वाहतूक करताना नागरिकांना दिसतात मात्र यापासून संबंधित विभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे? याविषयी परिसरात उलटसुलट चर्चांना कमालीचे उधाण आले असून वास्तविक पाहता शासनाचे नियम धाब्यावर बसवून ऐवढ्या मोठ्याप्रमाणात बिनधास्तपणे अवैधरीत्या होत असलेल्या वाळू तस्करी आणि तस्करावर दंडात्मक कारवाई होणे गरजेचे होते. मात्र, आजतागायत यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे बोलले जात आहे. आतातरी संबंधित विभाग अधिकारी याकडे लक्ष देऊन या वाळू तस्करावर कारवई करणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.