सावली:- तालुक्यापासून ४० किमी अंतरावर असलेल्या बारसागड हे एक छोटेसे गाव आहे. बारसागड गावच्या सभोवताल जंगल आहे. जंगलात हिंस्त्रप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. येथील नागरिकांना ये- जा करण्यासाठी साधने नाहीत. नागरिकांना दवाखाना, तालुका व जिल्ह्याचे ठिकाणी, आठवडी , बाजार, बँकेची कामे अशा विविध कामांकरिता आणि विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाची बस आवश्यक आहे. मात्र स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही लालपरी पोहोचली नसल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून पायदळ प्रवास करावा लागत आहे.
सावली तालुक्यातील बारसागड गावाची लोसंख्या २०० च्या घरात आहे. येथील गटग्रामपंचायत ५ किमी अंतरावरील चिखली येथे आहे. जनतेला आपल्या कामाकरित पायदळच जावे लागते. तलाठी कार्यालय गावापासून पाच किमी अंतरावर मेहा बुज येथे आहे. या दोन्ही गावांना ग्रा.पं. व तलाठी कामानिमित्त जाण्यासाठी जंगलाच्या मार्गाचा अवलंब करावा लागतो. यासाठी त्यांच्याकडे कुठलेही प्रवासी वाहतुकीचे साधन नसल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. यात मानव वन्यप्राणी संघर्ष होण्याची शक्यता - नाकारता येत नाही आणि या गावात अश्या घटना घडलेल्या आहेत. मागील आठवड्यात गावापासून ५ किमी अंतरावरील बोरमाळा गावातील एका चार वर्षाच्या मुलाला आईच्या डोळ्यादेखत वाघाने उचलून नेल्याची घटना ताजी असताना बारसागड येथील जनतेचा जीव गेल्यावर बस सुरू होईल काय, असा सवाल येथील प्रशासनाला विचारला जात आहे.
महामंडळची बस सुरू करावी,यासाठी या परिसराचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खुशाल लोडे यांनी सन २०१४ पासून ते आजतागायत राज्य परिवहन महामंडळ आणि तालुका प्रशासन यांना पत्राद्वारे आणि जिल्हा पालकमंत्र्यांना 30 डिसेंबर 2022 ला निवेदन देऊन मागणी केली परंतु शासन व प्रशासनाने याची दखल घेतली नाही.येथील जनतेची बसअभावी होणारी अडचण लवकरात लवकर दूर व्हावी,अशी मागणी बारसागड येथील नागरिकांनी केली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत