चंद्रपूर जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच


अज्ञात चोरांनी ३ तोळे सोन्यासह रोख रक्कम पळविली
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- अज्ञात चोरांनी भद्रावती शहरात दागिने व रोख रक्कम पळविण्याचा सपाटा सुरू केला असून मागील दहा दिवसांत चोरी ची दुसरी घटना घडल्याने शहरात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. 

      प्राप्त माहितीनुसार, येथील जवळे प्लाॅटमधील रहिवासी बंडू कडूकर हे त्यांचे सासरे वसंत बडवाईक यांच्याकडे राहतात. दुमजली घर असल्याने वरच्या मजल्यावर बंडू कडूकर हे पत्नी आणि मुलगी यांच्यासह राहतात. तर खाली त्यांचे सासरे एकटेच राहतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडूकर कुटुंब रात्री खाली झोपायला येत होते. दरम्यान, दि.२७ जूनच्या रात्री ते झोपण्याकरिता खाली आले असता अज्ञात चोरांनी कडूकर कुटुंब राहत असलेल्या वरच्या मजल्यावरील घरात दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटात असलेली ३ तोळ्याची सोन्याची पोत, ४-४ ग्रॅमच्या सोन्याच्या २ अंगठ्या आणि ३४०० रुपये रोख असा एकूण ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला. 

      दरम्यान दि.२८ जून रोजी सकाळी ६ वाजता उठल्यावर बंडू कडूकर हे वर आपल्या घरी गेले असता त्यांना दाराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी दार उघडून घरात प्रवेश केला असता त्यांना कपाटाचे दार उघडे व सामान खाली अस्ताव्यस्त पसरलेले दिसले. दागिने आणि रोख रकमेची चौकशी केली असता ते लंपास झाल्याचे आढळून आले. या घटनेची बंडू कडूकर यांनी भद्रावती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. अज्ञात चोरांचा शोध घेण्याकरिता श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.परंतु पावसामुळे श्वानपथक माग काढू शकले नाही. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी अज्ञात चोरांच्या विरोधात भा.दं.वि. ३८०, ४५७ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
   
   दरम्यान, याच जवळे प्लाॅटला लागून भोजवार्ड ही वस्ती आहे. या वार्डातील सुधाकर कवासे हे आपल्या कुटुंबासह पुणे येथे गेले असता त्यांचे बंद घरात खिडकीतून प्रवेश करुन अज्ञात चोरांनी १० तोळे सोन्याचे दागिने आणि ८० हजार रोख असा जवळपास ७ लाखांवर डल्ला मारल्याची घटना दि.२३ जून रोजी उघडकीस आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या