पायावर थुंकी उडाल्‍याच्‍या कारणावरून तरुणाची हत्या #chandrapur #amrawati #murder

Bhairav Diwase
अमरावती:- पायावर थुंकी उडाल्‍याच्‍या कारणावरून उद्भवलेल्या वादात एका तरुणाची हत्या करण्यात आली. ही घटना बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील मिल चाळ परिसरात सोमवारी घडली. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. राहुल जनार्दन वसुकर (३५) रा. मिल चाळ, बडनेरा असे मृताचे नाव आहे. बडनेरा पोलिसांनी आरोपी सिद्धांत उत्तम डोंगरे (१९) रा. मिल चाळ, बडनेरा याला ताब्‍यात घेतले आहे. 

राहुल हा सोमवारी एका सलूनमध्ये दाढी व कटिंग करायला गेला होता. सलूनमधून पायदळ घरी जात असताना तो रस्त्यात थुंकला. त्यावेळी थुंकी आरोपी सिद्धांत डोंगरे याच्या पायावर उडाली. त्यामुळे सिद्धांत राहुलच्या मागे धावला आणि त्याच्यावर लोखंडी सळाखीने हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झालेला राहुल हा खाली कोसळला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर राहुलला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी मृत राहुलची पत्नी वैशाली (३०) हिने बडनेरा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सिद्धांतविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास ठाणेदार नितीन मगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.