बेकायदेशीर प्रकारावर आळा घालण्याची सूरज ठाकरे यांची मागणी
चंद्रपूर:- राज्यात युती शासनाच्या कार्यकाळात काही टोलनाक्यांवर कार आणि तत्सम वाहनांना टोलमाफी करण्यात आली होती. तेव्हापासून बहुतांश टोलनाक्यांवरती कारचा टोल वसूल केला जात नसताना बल्लारपूर -चंद्रपूर मार्गावरील विसापूरच्या टोलनाक्यावर फास्ट टॅगच्या माध्यमातून कारचाही टोल कपात केला जात आहे. हा प्रकार बेकायदेशीर असून, यावर आळा घालत कपात केलेले पैसे परत करण्याची मागणी युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. (Robbery of motorists through fast tag at Visapur toll booth)
विसापूर येथे मागील अनेक वर्षांपासून टोलनाका अस्तित्वात असून, काही वर्षांपूर्वी राज्यातील अनेक टोलनाक्यांवर कार व हलक्या वाहनांसाठी टोलमाफी करण्यात आली होती. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर व नंदोरी येथील टोलनाक्याचाही समावेश होता. तेव्हापासून कार व त्यापेक्षा हलक्या वाहनांचा टोल कपात केला जात नसताना विसापूरच्या टोलनाक्यावर बनवाबनवी करीत फास्ट टॅगच्या माध्यमातून आपोआप टोल कपात केला जात आहे. केवळ २० किलोमीटरच्या प्रवासाकरिता नकळत फास्ट टॅगमधून टोल कापला जात असून, हा मनमानी प्रकार कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. या टोलनाक्यावर अनेकदा वाहनधारकांचे वादही झाले असून, मारहाणीपर्यंत घटनासुद्धा पोहोचल्या आहेत. आता शासनाने टोलमाफी केली असताना कारचालक व इतर हलक्या वाहन मालकांच्या खिशाला कात्री लावण्याचा गंभीर प्रकार टोलनाका व्यवस्थापनाकडून केला जात आहे. त्यामुळे हा बेकायदेशीर प्रकार तत्काळ थांबवून आजपर्यंत कपात केलेले पैसे परत देण्याची मागणी सूरज ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत