ग्रामसभेत अवैध दारु विक्रेत्याचा धिंगाणा #chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase
0

महिलांना अर्वाच्य शिवीगाळ व पाहुन घेण्याची धमकी

शेकडो महिलांचा एल्गार, भद्रावती पोलिस स्टेशनवर दिली धडक

भद्रावती:- ग्रामसभेत गावातील दारु बंदीच्या ठरावाबाबत चर्चा सुरु असतांना गावातीलच एका अवैध दारु विक्रेत्याने भर सभेत धिंगाणा घालुन महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत पाहुन घेण्याची धमकी दिल्याची घटना दि.२१ जून रोजी सकाळी ९.३० वाजता भद्रावती तालुक्यातील कोंढा या गावी घडली.

पोलिस सुञांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२१ जून रोजी सकाळी ९ वाजता ग्राम पंचायत कार्यालय कोंढा येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक, तंटामुक्ति समिती अध्यक्ष यांच्यासह गावातील १०० ते १५० नागरिक उपस्थित होते. सभा सुरु असताना गावात दारु बंदीबाबत चर्चा सुरु होती. या वेळी गावात अवैध दारु विक्री करणारा राहुल दिलीप चव्हाण हा इसम तेथे आला व सभेला उपस्थित असलेल्या महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत पाहुन घेईन म्हणून धमकी देऊ लागला.यावेळी पोलिस पाटील आणि सरपंच यांनी त्याला समजावून बाहेर घेऊन गेले.

याप्रकरणी सुरेखा शत्रुघ्न तोडासे या महिलेने भद्रावती पोलिस ठाण्यात राहुल चव्हाण विरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध भा.दं.वि. २९४ व ५०६ कलमान्वये गुन्हे दाखल केला आहे. पुढिल तपास भद्रावती पोलिस करित आहेत.
आंदोलनाचा इशारा

आजचा या घटनेसंदर्भात वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे भाजपचे विस्तारक नरेंद्र जिवतोडे यांनी सांगितले की, कोंढा गावातील महिला दारु बंदीचा ठराव पारित करण्याकरिता ग्रामसभेत गेल्या असता त्यांना एका अवैध दारु विक्रेत्यांकडून पाहुन घेण्याची धमकि देण्यात आली. या प्रकरणासंदर्भात निवेदन देण्या करिता कोंढा येथील महिला भद्रावती पोलिस स्टेशन ला आल्या असता ठानेदार बिपीन इंगळे यांनी निवेदन घेण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली. परंतु महिलांचा आक्रोश पाहुन कारवाई करण्याचे आश्वासन दिले. जर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई झाली नाही तर आम्ही मोठे आंदोलन करु असा इशाराही जिवतोडे यांनी दिला.

संपूर्ण तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करा

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक अफजल भाई म्हणाले कि, तालुक्यात कोणत्याही ठिकाणी अवैध रीत्या दारु विकल्या गेली आणि त्यावर भद्रावती पोलीसांकडून कारवाई करण्यात आली नाही तर तालुक्यातील संपुर्ण महिला एकत्र येवून पोलिस ठाण्यावर धडक देतील. तसेच तालुक्यातील सर्व अवैध धंदे, अवैध दारु विक्रि, खर्रा विक्रि बंद करण्यात यावी अन्यथा मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभारु असा इशारा दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)