भद्रावती:- तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने प्रेमी युगुल विवाहबंधनात अडकल्याची घटना भद्रावती तालुक्यातील कोकेवाडा(तु.) येथे नुकतीच घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील कोकेवाडा(तु.) येथील युवक सुनील देवराव दडमल (२८) व सोनेगांव पो.आष्टा येथील युवती कु. पल्लवी शत्रुघ्न नन्नावरे (२३) यांच्यात अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनीही आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. परंतु या आंतरजातीय विवाहाला घरच्या मंडळींचा विरोध होता. त्यामुळे उभयतांनी तंटामुक्त समिती आणि पोलिस पाटील यांच्याकडे धाव घेतली. दोघांच्याही म्हणण्यानुसार विवाह लावून देण्याकरिता गावातील ग्राम पंचायत कार्यालयात एक बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत पोलिस पाटील भोलेश्वर सोयाम, तंटामुक्त समिती अध्यक्ष गुणवंत चिकटे, सरपंच विद्या सावसाकडे, ग्राम पंचायत सदस्य मोतीराम शेंडे, प्रीती सोयाम, माजी उपसरपंच किशोर मडावी आणि गावकरी उपस्थित होते.
या सर्वांच्या उपस्थितीत सुनील आणि पल्लवी यांनी विवाहबंधनात अडकण्याचा आपला निर्णय जाहीर केला. त्यामुळे उपस्थित सर्वांनी त्यांचा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला. विवाहास आवश्यक असणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यात आली आणि सर्वांच्या साक्षीने सुनील आणि पल्लवी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्यासाठी विवाहबंधनात अडकले.