भद्रावती:- शहरात नव्याने तयार करण्यात आलेल्या भद्रनाग मंदिर ते बुद्ध लेणीपर्यंत असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर सर्वत्र गिट्टी पसरलेली असून रस्ता तयार करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्यावरील पसरलेली गिट्टी साफ न केल्याने या रस्त्यावर अपघाताचे सत्र सुरू झाले असून एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हा रस्ता पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात येत आहे. मात्र शहरातील नागरिकांना याबद्दलची माहिती नसल्यामुळे ते याचे खापर नगरपरिषद प्रशासनावर फोडत असल्यामुळे नगरपरिषद मात्र नाहक बदनाम होत आहे. शहरातील भद्रनाग मंदिर ते विजासन व पुढे देऊरवाडा गावापर्यंत हा रस्ता मंजूर करण्यात आल्यानंतर ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याचे काम खोळंबले होते. त्यानंतर अनेक निवेदने दिल्यानंतर ठेकेदारा तर्फे या सिमेंट काँक्रेट रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले.
काँक्रीटचा मुख्य रस्ता व या रस्त्याच्या दुतर्फा पेविंग ब्लॉक लावणे असे या रस्त्याचे स्वरूप आहे. मात्र ठेकेदाराने हा रस्ता तयार करून अद्याप रस्त्याच्या दुतर्फा पेविंग ब्लॉक लावले नसल्याने रस्ता जमिनीच्या एक फूट उंच झालेला आहे. परिणामी समोरून वाहन आल्यास वाहनधारकाला आपले वाहन रस्त्याच्या कडेला घेता येत नाही .अशावेळी गडबडीत या उंच रस्त्यावरून वाहन खाली आदळून अपघात घडत आहेत. रस्ता तयार केल्यानंतर तो साफ करण्यात आला नसल्याने या रस्त्यावर सर्वत्र बारीक व ठोकळ गिट्टी पसरली आहे. त्यामुळे वाहन स्लिप होऊन अनेक किरकोळ अपघात घडले आहेत. रस्ता स्वच्छ न केल्यामुळे वाहन जाताना धुळीचे लोट ऊडून त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. त्यामुळे या सदोष रस्त्यावरून वाहन धारकांना जीव मुठीत घेऊन वाहत चालवावे लागत आहे. तसेच अपघाताचा धोकाही कायम आहे.त्यामुळे हा रस्ता स्वच्छ करून या रस्त्याच्या दुतर्फा पेविंग ब्लॉक लाऊन तो समतोल करावा अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत. विशेष म्हणजे चार दिवसांच्या अगोदर खुद्द नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी या रस्त्याचे अर्धवट असलेले बांधकाम पूर्ण करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत