भद्रावती:- पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे येथील डोलारा तलाव वस्तीतील अवैध कत्तलखान्यावर टाकलेल्या धाडीत पोलिसांना कत्तल केलेल्या अवस्थेतील दोन गोवंश आढळून आले असून धारदार शस्त्रासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील डोलारा तलाव वस्तीत अवैधरित्या गोवंशाची कत्तल अनेक दिवसांपासून केली जात असल्याची गुप्त माहिती ठाणेदार बिपीन इंगळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दि.१६ जून रोजी सकाळी ६ वाजता सापळा रचून अबू कुरेशी याच्या घरी धाड टाकली. यावेळी शकील रहेमान शेख(४०) व महोम्मद बिराम शेख(३२) हे दोन्ही इसम हातात धारदार शस्त्र घेऊन गोवंशाची कत्तल करीत असताना रंगेहाथ आढळून आले. त्यामुळे त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडील कत्तल करीत असलेले दोन गोवंश जप्त करण्यात आले.शकील शेख आणि महोम्मद शेख यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची अधिक चौकशी केली असता अबू कुरेशी हा या अवैध कत्तलखान्याचा मुख्य सुत्रधार असल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे अबू कुरेशी याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तो फरार आहे. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. आरोपी शकील रहेमान शेख व महोम्मद बिराम शेख यांना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मागील काही दिवसात तालुक्यातील गोवंश चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे स्थानिक शेतकरी व नागरिक यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते.
या धाडीत अबू याच्या घराची झडती घेतली असता आणखी ३ जिवंत गोवंश आढळून आले. घटनास्थळी मिळालेल्या जनावरांबाबत विचारणा केली असता ही जनावरे अबू याच्या मांगली येथील जंगल परिसरात गुप्त ठिकाणी असलेल्या फार्म हाऊस मधून आणले असल्याचे त्यांनी सांगितले. सदर फार्म हाऊसची झडती घेतली असता तेथे आणखी १३ गोवंश बंदिस्त अवस्थेत आढळून आले. सदर गोवंशांना पंचाच्या समक्ष ताब्यात घेण्यात आले.
अबूच्या फार्म हाऊसमधून १३ व त्याच्या अवैध कत्तलखाण्यातून जप्त केलेले ३ अश्या १६ गोवंशाची किंमत एकूण १ लाख १२ हजार असून या सर्व गोवंशांना जैन मंदिर येथील गोशाळेत ठेवण्यात आले आहे.
ही कारवाई भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार बिपीन इंगळे गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि. विशाल मुळे, पो.ह. विश्वनाथ चुदरी, जगदिश झाडे, अनुप आष्टूनकर, निकेश ढ़ेंगे व मोनाली गारघाटे यांनी केली.