Top News

समाज माध्यमावरील आक्षेपार्ह पोस्टबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी:- जिल्हा पोलिस अधिक्षक परदेशी #chandrapur #Chandrapurpolice


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा आहे. सर्व जाती-धर्माचे सण येथे अतिशय गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. आगामी काळात सुद्धा सर्वधर्मीय सण हे शांततेच्या वातावरणात पार पाडले जातील, अशी मला खात्री आहे. जिल्ह्याची सौहार्दपुर्ण ओळख कायम ठेवण्यासाठी तसेच समाजात सकारात्मकता पोहचविण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे. विशेष म्हणजे समाज माध्यमावरील आक्षेपार्ह पोस्टबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले. (Everyone should be careful about offensive posts on social media:- District Superintendent of Police Pardeshi)


आगामी आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने नियोजन सभागृह येथे आयोजित जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे तर मंचावर सहाय्यक जिल्हाधिकारी मरुगानंथम एम., अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांच्यासह सर्व पोलिस उपअधीक्षक उपस्थित होते.

सर्वधर्मसमभाव व भाईचारा हीच आपली खरी ओळख आहे, असे सांगून पोलिस अधिक्षक श्री. परदेशी म्हणाले, आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आहे. यापुर्वीसुध्दा विविध धर्माचे सण एकत्र आले असून या काळात सर्वांच्या सहकार्याने सण / उत्सव शांततेत पार पाडले. भविष्यातही हा सौहार्द कायम राहील. समाज माध्यमे ही आभासी आहेत. एखाद्या आक्षेपार्ह पोस्टवरून समाजात ताणतणाव निर्माण होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. विशेषत: सर्वांनी याबाबत जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. दर महिन्याला ठाणेदारांनी आपापल्या परिसरातील शांतता समितीच्या सदस्यांना बोलवावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

समाज माध्यमावरील विखारी प्रचाराचे बळी होऊ नका:- अतिरिक्त जिल्हाधिकारी देशपांडे

साधारणत: जुलैपासून सणांची सुरुवात होते. पुढील तीन-चार महिने आपण सण उत्सवात मग्न असतो. त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे सुध्दा अपेक्षित आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सौहार्दपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे एखाद्या पोस्टची खात्री पटल्याशिवाय कोणतीही गोष्ट फॉरवर्ड करू नका. आपल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, किंवा कोणाच्या भावना दुखावणार नाही, याची दक्षता घ्या. नागरिकांनो समाज माध्यमावरील विखारी प्रचाराचे बळी ठरू नका, असे कळकळीचे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. तसेच सण उत्सव काळात नियमित पाणी पुरवठा आणि स्वच्छता याकडे मनपा आयुक्त आणि नगर परिषद / पंचायतीच्या सर्व मुख्याधिका-यांनी लक्ष द्यावे, अशी सुचनाही त्यांनी केली.

शांतता समितीच्या सदस्यांनी केलेल्या सुचना : शांतता समितीच्या बैठका केवळ सण / उत्सवाच्याच वेळी नव्हे तर नियमितपणे घेणे, सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवांवर सायबर सेलने नियंत्रण ठेवावे, आक्षेपार्ह पोस्ट आली तर एक जबाबदार नागरिक म्हणून ती लगेच डीलीट करावी, अफवांमुळे अनुचित घटना घडणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा अनेक सुचना समितीच्या सदस्यांनी केल्या.

कार्यक्रमाचे संचालन श्री. आवळे यांनी तर आभार विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी कदम यांनी मानले. बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक यांच्यासह पोलिस विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी, पोलिस पाटील आणि शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने