(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- बंद असलेले घर फोडून १० ग्रॅम सोने व ८० हजार रोख असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दि.२३ जून रोजी शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान भद्रावती शहरात उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, येथील भोजवार्डातील रहिवासी सुधाकर कवासे हे दि.१८ जून रोजी आपल्या परिवारासोबत पुणे येथे नातेवाईकाकडे गेले होते. त्यानंतर ते दि.२३ जून रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घरी परतले. घरात प्रवेश करताच त्यांना घराची खिडकी फोडलेली व घरातील कपाट खुले दिसले. तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त पसरलेले दिसले. कपाटातील दागिने व रोख रकमेची चौकशी केली असता १० ग्रॅमचे सोन्याचे दागिने व ८० हजार रोख असा ऐवज लंपास केल्याचे आढळून आले.
भद्रावती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस घटनास्थळी आले व त्यांनी पाहणी केली. त्यानंतर चंद्रपूर येथून श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पाऊस आला असल्याने श्वानपथकाला या अज्ञात चोरट्यांचा माग काढता आला नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत