बंदोबस्त करण्याची अशोक येरगुडे यांची मागणी
भद्रावती:- तालुक्यातील घोडपेठ येथील हायवे लगत असलेला एक महाकाय जिर्ण झालेला वृक्ष हा गावातील नागरिकांसाठी व हायवेवरील वाहतूकदारांसाठी अत्यंत धोकादायक ठरत असून एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी या वृक्षाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी घोडपेठ येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक येरगुडे यांनी केली आहे.
हा जिर्ण झालेला वृक्ष गावातील जिल्हा परिषद शाळेच्या अगदी जवळ असून हायवेच्या कडेला आहे. या भागात गावातील नागरिक, विद्यार्थी तथा हायवेवरील वाहनांची सतत वर्दळ असते. हा वृक्ष पूर्णतः जीर्ण झालेला असून यापूर्वी या वृक्षाच्या फांद्या पडून किरकोळ अपघात झालेले आहे. सध्या पावसाळा सुरू झालेला असून सतत वादळी वातावरण असते. अशा अवस्थेत हा वृक्ष केव्हाही कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या जीर्ण वृक्षामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित विभागाने कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी या वृक्षाची योग्य ती विल्हेवाट लावून येथील नागरिकांना संभाव्य धोक्यापासून मुक्त करावे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक येरगुडे यांनी प्रसार माध्यमांद्वारे केली आहे.