राजुरा:- चंद्रपुरचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे हे आगामी होणारी राजुरा विधानसभा निवडणुक लढविणार असून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष एड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. राजूरा विधानसभेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी फुसे यांचे जिल्हाध्यक्ष पद गोंडाने यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
भूषण फुसे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून 31 डिसेंबर 2021 ला नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर भूषण फुसे यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढत शेकडो कार्यकर्ते जोडले. तसेच अनेक समुदायातील इतर कार्यकर्त्यांना सुद्धा जोडले. पक्षातर्फे पत्रकार परिषदा घेणे निवेदन देणे आंदोलन करणे मोर्चे करणे हे सातत्याने त्यांनी धडाका लावलेला होता. पक्षाला बळकट करण्यासाठी सर्व माध्यमांचा वापर करीत सर्वत्र विरोधकांना धास्ती होईल असं वातावरण राजुरा विधानसभा क्षेत्रात निर्माण केलं.
दरम्यान 6 जून ला भूषण फुसे यांची वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत आदीलाबाद येथे भेट झाली. यावेळी पूर्व विदर्भ प्रमुख समन्वयक डॉक्टर रमेश कुमार गजबे सुद्धा उपस्थित होते. या बैठकीत बाळासाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार व भूषण फुसे आता वंचित बहुजन आघाडीचे राजुरा विधानसभाचे अधिकृत उमेदवार असून फुसे हे संपूर्ण ताकतीने राजुरा विधानसभा पिंजून काढतील वंचित बहुजन आघाडीसाठी राजुरा विधानसभा जिंकून आणतील असा विश्वास दाखविण्यात आला.
फुसे यांनी सातत्याने प्रामाणिकपणे एक निष्ठेने केलेल्या कार्याची ही पोचपावती आहे, बाळासाहेबांना हा विश्वास आहे की वंचित बहुजन आघाडीचा भूषण फुसे हे विधानसभेचा उमेदवार राजुरा विधानसभेमध्ये निवडून येऊ शकतो आणि त्यामुळे संघटनात्मक जबाबदारी व इतर दोन विधानसभाची जबाबदारी आंबेडकर यांनी प्राध्यापक गुंडाने यांच्याकडे सोपवलेली आहे.