रुळावरून चालतांना कानात हेडफोन अन् मागून धडधड मालगाडी आली. पुढे..... #Chandrapur #Akola

Bhairav Diwase
अकोला:- रुळावरून चालत असताना युवकाच्या कानात हेडफोन होते. मागून धडधड करत मालगाडी आली. आवाज ऐकू न आल्याने शेवटी अनर्थच घडला. मालगाडीच्या धडकेत युवकाचा दुर्दैवी अंत झाला. जिल्ह्यातील माना-कुरूम स्थानकादरम्यान येणाऱ्या मंडुरा रेल्वे स्थानकानजीक रामटेक परिसरात ही घटना घडली.

परिसरातील रहिवासी ३५ वर्षीय आशिष भगवान गडलिंग हे रेल्वे रूळ ओलांडून जात असताना त्याच्या कानात हेडफोन होते. त्यामुळे दोन्ही बाजूने येणाऱ्या मालगाड्यांचा आवाज त्यांना ऐकू आला नाही. डाउन बाजूने येणाऱ्या मालगाडीची त्यांना जोरदार धडक बसली. त्यातच आशिष यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती माना पोलिसांना दिल्यावर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी माना पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.