Top News

वाढदिवस साजरा करणाऱ्या मद्यधुंद युवकांचा बारमध्ये धिंगाणा #chandrapur #chimur


चिमूर:- चिमूर येथील वरोरा मार्गावरील ग्रीनलँड बारमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या मद्यधुंद युवकांनी नशेत बार मालकास मारहाण करीत बारमध्ये तोडफोड केल्याची घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार युवकांना अटक असून चार युवक पसार झाले आहेत. पोलिस त्यांच्या मागावर आहेत. गोलू उर्फ रोहित श्रीरामे,नयन तळवेकर,राहुल, उमेश तळवेकर, अनिकेत पोइनकर (रा. चिमूर) अशी अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत.

पोलिस सूत्रानुसार, चिमूर- वरोरा मार्गावरील ग्रीनलँड बारमध्ये सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास आठ युवक वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. एकाच टेबलावर बसून सर्व जण मद्यप्राशन करीत होते. दरम्यान, बार बंद करण्याची वेळ होत आली तरी त्यांचे मद्यप्राशन करणे सुरूच होते. त्यामुळे बार मालक राकेश नंदुरकर यांनी वेटरव्दारे त्यांना आटोपता घेण्याची सूचना बार बंद करीत असतांना केली त्या युवकांनी बार मालकाला शिवीगाळ सुरू केली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी बार मालकाला युवकांनी मिळून मारहाण केली. त्यानंतर बारमधील टेबल, खुर्च्या व दारूच्या बाटल्या व ग्लास तोडफोड केले. यामध्ये मोठ्याप्रमाणात बारमालकाचे आर्थिक नुकसान झाले आहे.

घटना सूरु असतांना मालकाने ११२ टोल फ्री क्रमांकावर पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र,तोपर्यंत काही युवक पसार झाले होते तर घटनास्थळी असलेले युवक गोलू उर्फ रोहित श्रीरामे, नयन तळवेकर,राहुल,उमेश तळवेकर,अनिकेत पोइनकर (रा. चिमूर) यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध भादंवि १८६० कलम १४३, १४७, १४९, ५०४, ४२७, ३२३ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांचे मार्गदर्शनात सूरु आहे.

ग्रीनलँड बारमध्ये घडलेल्या घटनेचा चिमूर लिकर बार असोसिएशनने बार बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे. बारमध्ये धिंगाणा घालणाऱ्या युवकांना अटक करण्याची मागणी लिकर बार असोसिएशन अध्यक्ष मनिष नंदेश्वर, उपाध्यक्ष उमेश कुंभारे,सचिव धरमसिंह वर्मा, कोषाध्यक्ष भीमराव ठावरी, सदस्य श्रीनिवास निवटे, पदमाकर बनकर, प्रमोद भटगरे, मनमित कुंभारे, राकेश नंदुरकर, संगीता मराठे आदींनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने