पतीने केली पत्नीची कुऱ्हाडीने हत्या #chandrapur #gadchiroli #murder

Bhairav Diwase
0

गडचिराेली:- जून महिन्यात जावई व मुलाने मारझाेड केली. तेव्हापासून पत्नी मुलीकडे राहायला गेली. हा राग मनात धरून पतीने जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या पत्नीच्या डाेक्यावर कुऱ्हाडीने घाव घालून तिची हत्या केली तर प्रतिकार करणाऱ्या मुलीलासुद्धा गंभीर जखमी केले, ही घटना काेरची तालुक्यातील काेचीनारा येथे रविवार २ जुलै राेजी सकाळी ११:३० वाजता घडली.

रेखाबाई प्रीतराम धकाते (४५) असे मृत महिलेचे तर श्यामबाई संजय देवांगण (२७) रा. काेचीनारा असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. (Husband killed his wife with an axe)

सविस्तर वृत्त असे की, रेखाबाई व श्यामबाई ह्या दाेघीही शेजारील आशा भक्ता व संगीता बघवा यांच्यासोबत रविवारी सकाळी सरपण गोळा करण्यासाठी गावालतच्या जंगलात गेल्या होत्या. तेव्हा आरोपी पती प्रीतराम धकाते (४८) हा त्यांच्यावर पाळत ठेवून हाेता. हीच संधी साधून प्रीतरामने रेखाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घातले. यावेळी मुलगी श्यामबाई ही प्रतिकार करण्यासाठी गेली. तेव्हा तिच्या डाव्या हातावर व कमरेवर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. तसेच पत्नीवर घाव घालणे सुरूच ठेवले. याचवेळी जखमी मुलीने पती संजय देवांगण व भाऊ महेशला फोन करून घटनेबाबत माहिती दिली.

ते येतपर्यंत आरोपी पती प्रीतराम घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेन पसार झाला. यानंतर जखमींना दुचाकीने कोरची ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले; परंतु रेखाबाई हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मुलगी श्यामबाई देवांगण हिला गंभीर अवस्थेत गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले. ह्या घटनेबाबत कोरची पोलिस स्टेशनमध्ये आरोपी प्रीतराम विरोधात कलम ३०२, ३२६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास सहायक पाेलिस निरीक्षक गणेश फुलकवर करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)