पीओपी मूर्तींवर राहणार मनपाचा 'वॉच' #chandrapur

Bhairav Diwase

विसर्जनस्थळाच्या क्षमतेनुसारच गणेशमूर्तींची ठेवावी लागणार उंची

चंद्रपूर:- मागील वर्षीपासून पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने रामाळा तलाव येथे विसर्जन करणे बंद करून ईरई नदी काठावर विसर्जन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या स्थळी पाण्याची खोली ही ६ ते ८ फूट पर्यंत मिळु शकते त्यामुळे मूर्तिकार व गणेश मंडळांनी विसर्जन स्थळाच्या क्षमतेनुसारच गणेश मुर्तींची उंची राखण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेने केले आहे.

चंद्रपूर शहरातील गणेशोत्सव पूर्वतयारीसाठी विविध विभागाचे अधिकारी आणि मूर्तिकार यांची बैठक मनपा सभागृहात २८ जुलै रोजी आयोजीत करण्यात आली होती. यावेळी आयुक्त श्री. विपीन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त श्री.चंदन पाटील, उपायुक्त श्री.मंगेश खवले,उपायुक्त श्री.अशोक गराटे, पोलीस निरीक्षक श्री.सतीशसिंह राजपूत,श्री.सुजीत बंडीवार, सहायक आयुक्त श्री.नरेंद्र बोभाटे, श्री.राहुल पंचबुद्धे, डॉ.वनिता गर्गेलवार,डॉ. अमोल शेळके,श्री.नितीन रामटेके,प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रतिनिधी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी आणि मूर्तिकार प्रतिनिधींची उपस्थिती होती.

चंद्रपूर शहरात नागरिकांच्या सहकार्याने पीओपी मूर्तीं बनविणे, त्यांचा वापर व विक्री पूर्णतः बंद आहे व १०० टक्के पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा केला जातो. तरीही यावर्षीसुद्धा झोननिहाय पथकांद्वारे प्रत्यक्ष आणि गुप्त पद्धतीने मूर्तींची तपासणी केली जाणार आहे. मूर्तिकार व मातीच्या मूर्ती विक्री करणारे मूर्तिविक्रेते दोघांनाही मनपाकडे नोंदणी बंधनकारक आहे,नोंदणी न करता मूर्ती विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. नोंदणी आपापल्या परिसरातील झोन कार्यालयात करायची असुन पीओपी मूर्तीची विक्री, आयात आणि निर्मिती करताना आढळल्यास दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल होणार आहे.

मूर्तीची खरेदी करताना ती मातीचीच असल्याची प्रमाणित पावती ग्राहकांनी घ्यावी आणि ती मूर्तिकारांनी आपल्या स्वाक्षरीनिशी संपर्क क्रमांकासह द्यावी,कृत्रिम कलश,रथ,निर्माल्य कलश यांची व्यवस्था राहणार असुन शासनस्तरावर पर्यावरणपुरक गणेशोस्तव स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. यात सहभागी होऊन सर्वांनीच गणेशोत्सव आनंदाने साजरा करण्याचे आवाहन आयुक्त श्री. विपीन पालीवाल यांनी केले.