जिल्ह्यात NCCच्या ज्यूनियर विद्यार्थ्यांना सिनीअर विद्यार्थ्यांकडून मारहाण #chandrapur #Thane #Maharashtra #viralvideo#socialmedia


सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

ठाणे:- NCC च्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातच एका सिनिअर विद्यार्थ्यांनं अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हाय़रल झालाय. ठाणे शहरातील बांदोडकर आणि जोशी-बेडेकर महाविद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडलाय. दरम्यान, महाविद्यालयानं अशा घटनांना रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय.

NCC च्या विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यात जमिनीवर डोकं ठेवून विचित्र पद्धतीनं ट्रेनिंग दिलं जातं होतं. त्याचवेळी NCC च्याच एका सिनिअर विद्यार्थ्यांनं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी काही जणांच्या पार्श्वभागावर काठीनं अमानुषपणे मारहाण केली. दरम्यान, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एकानं ही सगळी घटना आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केल्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं सांगितलं जातंय. NCC च्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान लष्कर आणि नौदलाचं प्रशिक्षणपूर्व धडे दिले जातात. अशा प्रशिक्षणात चूक झाली तर विद्यार्थ्यांना शिस्त यावी म्हणून विविध प्रकारच्या शिक्षा केल्या जातात. मात्र, अशापद्धतीनं अमानुषपणे मारहाण झाल्यानं विद्यार्थ्यांसह पालकवर्गातही खळबळ उडालीय.

दरम्यान, अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. या प्रशिक्षणादरम्यान शिक्षक गैरहजर असतांना सिनिअर विद्यार्थी हेच प्रशिक्षक म्हणून काम करतात. त्या दरम्यानच ही घटना घडलीय. यापुढे असे प्रकार घडू नये म्हणून एका समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचं प्राचार्य सुचित्रा नाईक यांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या