आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक #chandrapur #Mumbai


भडकलेल्या मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यावर होणार चर्चा?

मुंबई:- शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले असून आंदोलनकर्त्यांमध्ये जागोजागी नेत्यांच्या विरोधात संताप उसळून आला आहे. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी (दि.३१) दुपारी बारा वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असून या बैठकीत मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर तोडगा काढण्यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा अमरण उपोषण आरंभल्याने राज्यभर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकार आरक्षणावर ठोस तोडगा काढत नसल्याने मराठा समाजात अस्वस्थता निर्माण झाला असून त्याचा उद्रेक बीड जिल्ह्यासह राज्यात अन्य ठिकाणीही झाला आहे. आजवर शांत असलेल्या या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले असून बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर यांची घरे जाळण्यात आली आहेत. तर आमदार प्रशांत बंब आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाचीही नासधूस करण्यात आली. त्यामुळे आमदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार खासदारांनी राजीनामे द्यावे, म्हणून त्यांच्यावर दबाव वाढत आहे.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार हिंगोलीचे हेमंत पाटील, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, भाजपाचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार आणि पाथरीचे काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांनी आपले राजीनामे दिले आहेत. तसेच मंत्री आणि राजकीय नेत्यांनाही राज्यात फिरणे मुस्किल झाले आहे. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली असून त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा अपेक्षीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत