माय-बाप म्हणते शाळा शिक, सरकार म्हणते पकोडे विक! #Chandrapur
बेरोजगारांची जोरदार नारेबाजी; सरकारी नोकरीच्या कंत्राटीकरणाविरोधात हजारो तरुण रस्त्यावर
चंद्रपूर:- शिक्षण व नोकरी बचाव समिती जिल्हा चंद्रपूरच्या वतीने सरकारने काढलेल्या खासगीकरण, कंत्राटीकरणाच्या निर्णयाविरोधात जन आक्रोश मोर्चाचे आंदोलन दीक्षाभूमी डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वरोरा नाका चंद्रपूर येथून जटपुरा गेट, कस्तुरबा चौक, गिरनार चौक, गांधी चौक मेन रोड जटपुरा गेट, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
१२ वाजतापासून सुरू झालेल्या आंदोलनात हजारो युवक, पालक, शिक्षक, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण तथा विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. तरुणांनी तथा विद्यार्थ्यांनी कंत्राटीकरणाच्या विरोधात तीव्र शब्दात रोष व्यक्त केला.
एक नोव्हेंबर २००५ नंतर नोकरीवर लागलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी, विद्यार्थी हितासाठी वीस पटांखालील शाळा बंद होऊ नये यासाठी समोर शाळा संकल्पना रद्द करावी, राज्यातील विविध कार्यालयांत रिक्त असलेली तथा शिक्षक व प्राध्यापकांची पदे तत्काळ करण्यात यावी, शासनाने स्पर्धा परीक्षा शुल्काच्या नावाखाली हजारो रुपयांची सुरू केलेली वसुली तत्काळ थांबून स्पर्धा परीक्षेचे शुल्क शंभर रुपये करण्यात यावे, तलाठी पदभरती तसेच विविध पदभरती होणाऱ्या पेपर फुटीवर नियंत्रण आणण्यासाठी कायमस्वरूपी कडक असा कायदा करण्यात यावा, इत्यादी मागण्यांना विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून वाचा फोडली.
यावेळी विविध महाविद्यालयांतील तसेच शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे विद्यार्थी, सामाजिक क्षेत्रात काम करणारे विविध संघटनेचे पदाधिकारी, जुनी पेन्शन कर्मचारी संघटना, राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटना, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व इतर विविध शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत