यंदाच्या माता महाकाली महोत्सवासाठी मुख्यमंत्री चंद्रपुरात येणार! #Chandrapur

Bhairav Diwase
0



चंद्रपूर:- नवरात्रीदरम्यान चंद्रपुरात माता महाकाली महोत्सव आयोजनाची परंपरा गतवर्षीपासून सुरू करण्यात आली. यंदा १९ ऑक्टोबरपासून महोत्सव होणार आहे. या महोत्सवात उपस्थित राहावे, यासाठी महाकाली माता महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वर्षा निवासस्थानी भेट घेऊन निमंत्रण दिले.



महोत्सवादरम्यान माता महाकाली दर्शनासाठी चंद्रपुरात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिल्याचे आमदार जोरगेवार यांनी गुरुवारी (दि. ५) सांगितले. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार आणि समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुनरी व माता महाकालीची मूर्ती भेट स्वरूप दिली आहे.


यावेळी महाकाली माता महोत्सव समितीचे उपाध्यक्ष अजय जयस्वाल, बलराम डोडाणी, कोषाध्यक्ष पवन सराफ, सदस्य मधुसूदन रुंगठा, अशोक मत्ते, मिलिंद गंपावार, राजू शास्त्रकार, कुक्कू सहाणी, मोहित मोदी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुनरी व माता महाकालीची मूर्ती भेट दिली. चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली देवीची महती राज्यभरात पोहोचावी, शहरातील पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून गतवर्षीपासून चंद्रपुरात माता महाकाली महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. गतवर्षी महोत्सवाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यंदा १९ ऑक्टोबरपासून महाकाली मंदिर पटांगणात हा महोत्सव सलग पाच दिवस होणार आहे. २३ ऑक्टोबरला माता महाकालीची नगर पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे.



पाच दिवस भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी


माता महाकाली महोत्सवात पाच दिवस धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची भरगच्च मेजवानी राहणार आहे. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, वैशाली सामंत, निरंजन बोबडे, देवीगीत जागरणकार लखबीर सिंग लख्खा, युवा कीर्तनकार सोपानदादा कनेरकर यांचा कार्यक्रम होणार आहे. याशिवाय विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे व्याख्यान व शासनाच्या योजनांचा प्रसार-प्रचार करण्यासाठीही विविध सत्र आयोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यंदा प्रसिद्ध गायिका ईशरत जहाँ यांचा रोड शो होणार आहे.



९ हजार ९९९ कन्यांचे पूजन


श्री माता महाकाली मंदिर परिसरातील राणी हिराई कक्षात १९ ते २३ ऑक्टोबरदरम्यान ९ हजार ९९९ कन्यांचे पूजन व कन्याभोजन करण्यात येणार आहे. ऐतिहासिक हेरिटेज वॉक, महिला व युवतींसाठी मुक्त व्यासपीठ, चंद्रपूर वन विभागाकडून चित्रप्रदर्शन, पोलिस क्राइम ब्रँचकडून मार्गदर्शक सूचना केंद्र, पथनाट्य, देखावे, १०८ वारकरी टाळ, मृदंग गर्जना समूहसह विविध कार्यक्रम होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)