अखेर कंत्राटी भरतीचा GR रद्द! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा#mumbai


मुंबई:- राज्य सरकारने आणलेल्या कंत्राटी भरती प्रक्रियेला तरुणांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पत्रकार परिषद घेऊन एक मोठी घोषणा केली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी आजच्या पत्रकार परिषदेत कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्यात आल्याची घोषणा केली आहे. सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्यामुळे राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत, कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्यात आल्याची मोठी माहिती दिली. त्याचबरोबर, "कंत्राटी भरतीची सुरुवात काँग्रेसने केली. आता तेच त्याविरोधात आंदोलन करतायत, या संदर्भात यांना लाजा का वाटत नाही. याचे पाप त्यांचे आहे. त्यांच्या पापाचे ओझे आपल्या सरकारने का उचलावे" असा देखील सवाल उपस्थित केला.

पुढे बोलताना, "कंत्राटी भरती संदर्भात पहिला जीआर 13 मार्च 2003 रोजी काढण्यात आला. त्यावेळीच्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या सरकारमध्ये कंत्राटी भरती झाली. नंतर 2010 साली अशोक चव्हाणांनी पहिला जीआर काढला. सहा हजार कंत्राटी पदाचा जीआर काढण्यात आला. खरे तर, कंत्राटी भरतीची सुरवातच काँग्रेसने केली होती, आता तेच त्याविरोधात आंदोलन करत आहे. त्यांच्या पापाचे ओझे आमचे सरकार उचलणार नाही म्हणून कंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे" अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलताना दिली.

दरम्यान, राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू केल्यामुळे त्याला तरुणांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. तसेच, या मुद्द्यावरून राज्यातील अनेक भागात आंदोलन देखील करण्यात आली आहेत. मात्र तरी देखील राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा वेग धरला होता. अखेर आज सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. ज्यामुळे अनेक तरुणांना दिलासा मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या