खाणींविरोधातील आंदोलन तीव्र होणार #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase
0


गुरुवारी माओवाद्यांनी पुकारला बंद



गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यात होत असलेल्या खाण प्रकल्पांना विरोध करण्यासाठी आंदोलन आणखी तीव्र करा, असं आवाहन करणारं पत्र माओवाद्यांनी प्रकाशित केलं आहे. तोडगट्टात आंदोलन करणाऱ्या आदिवासी नेत्यांना पोलिसांनी अटक केलीय. या कारवाईच्या विरोधात माओवाद्यांनी गुरुवारी (ता. 30) बंद पुकारलाय. माओवाद्यांच्या या पत्रकबाजीमुळं गडचिरोली पोलिस सतर्क झाले आहेत.


तोडगट्टाजवळ आदिवासी नेत्यांनी ग्रामस्थांसह पोलिसांना घेरलं होतं. सोमवारी (ता. 20) हा प्रकार घडल्यानंतर सध्या संपूर्ण एटापल्ली तालुक्यात कलम 144 लागू करण्यात आलाय. अशात माओवाद्यांनी पत्र काढत गडचिरोली बंद पुकारलाय. बंददरम्यान हिंसक घटनांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं आता पोलिस कामाला लागले आहेत.


भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) गडचिरोली पश्चिम सब झोनल ब्यूरो प्रवक्ता श्रीनिवास यांनं हे पत्र काढलंय. पत्रात गडचिरोलीतील उत्तरेकडील झंडापार पासून दक्षिणेकडील बाबुलाई पहाडापर्यंतच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास करून सरकार केवळ खाणींना परवानगी देत असल्याचा आरोप करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात एकेरी भाषेचा वापर करीत श्रीनिवासनं गडचिरोली, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाचा उल्लेख केलाय.



तोडगट्टा येथे सुमारे 255 दिवसांपेक्षाही जास्त कालावधीपासून खाण विरोधात आंदोलन सुरू आहे. आदिवासींच्या या आंदोलनाला माओवाद्यांनी पाठिंबा दिला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आदिवासी नेत्यांना मुक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अहेरीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम आणि अन्य लोकप्रतिनिधींनी यासाठी पोलिसांकडं पाठपुरावा करावा, असंही श्रीनिवासनं म्हटलय. गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यात कलम 144 लावत पोलिस आदिवासींना त्रास देत आहे. त्यामुळं गुरुवार, 30 नोव्हेंबरला माओवादी गडचिरोली बंद पाळणार आहेत. आदिवासी ग्रामसभांनी आंदोलन आणखी तीव्र करावं अशी चिथावणीही पश्चिम सब झोनल ब्यूरोनं दिलीय.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)