संस्थाचालकाकडे खंडणीची मागणी #pune

Bhairav Diwase
0
हातपाय तोडण्याची धमकी; गुन्हा दाखल
पुणे:- शिक्षण संस्था चालकाकडे १० लाखांच्या खंडणीची मागणी करून हातपाय तोडून गेम करण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार धायरी येथील बेनकर वस्ती येथे ४ जुलै २०२३ ते २८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे.

अक्षय रंगनाथ सावंत (वय २९, रा. धायरेश्वर व्हिला, धायरी) व प्रदीप अंकुश दोडके (वय ३५, रा. दांगट पाटील नगर, वडगाव बुद्रुक, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात शिक्षण संस्थाचालक शिवाजी मते (वय ४७, रा. शिवालय अपार्टमेंट, समृद्धी अंगण सोसायटी, धायरी) यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शिवाजी मते हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे वाहतूक सेनेचे अध्यक्ष आहेत. इशा इंटरनॅशनल प्री स्कूल व गुरूकुल विद्यालयाचे ते अध्यक्ष आहेत. आरोपी अक्षय सावंत आणि प्रदीप दोडके हे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. आरोपींनी मते यांच्या इशा इंटरनॅशनल प्री स्कूल व गुरूकुल विद्यालयाच्या बांधकामाबाबत पुणे महापालिकेकडे तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या अध्यक्षांकडे माहिती अधिकारामध्ये अर्ज दाखल केला होता. हा अर्ज मागे घेण्यासाठी आरोपींनी शिवाजी मते यांच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. तडजोडीअंती तीन लाख रुपयांची खंडणी आरोपींनी मागितली होती. या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करत आहेत.

हातपाय तोडून गेम करण्याची धमकी

याबाबत शिवाजी मते यांनी खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली होती. त्यावेळी सावंत याने 'तुला लय मस्ती आली आहे. तू माझ्याविरुद्ध खंडणी पथकाकडे तक्रार करतोस काय? तक्रार मागे घे, नाहीतर तुझे हातपाय तोडून तुझा गेम करेन,' अशी धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)