चिमूर:- किटाळी (ना.) येथील विवाहित युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार (दि. २९ डिसेंबर रोजी) सकाळी सात वाजता उघडकीस आली. पत्नी आठ महिन्यांपासून माहेरी राहत असल्याने नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रमोद नागोराव रासेकर (वय ३५) असे मृत विवाहित युवकाचे नाव असून, तो सुतारकाम करीत होता. प्रमोदची पत्नी मागील आठ महिन्यांपासून वडिलांकडे माहेरी राहत असल्याची माहिती आहे. प्रमोदला दारूचे व्यसनही होते.
घटनेच्या आदल्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रमोद रविवारी रात्री झोपला होता. मात्र, सोमवारी सकाळी आतून दार बंद असल्याने फटीतून शेजाऱ्यांनी बघितले असता प्रमोद गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. घटनेची माहिती चिमूर पोलिसांना देण्यात आली. पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण तिरानकर, शैलेश मडावी यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार मनोज गभणे यांच्या मार्गदर्शनात चिमूर पोलिस करीत आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.