काँग्रेसच्या आठ इच्छुकांचे उमेदवारीसाठी अर्ज
चंद्रपूर:- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून वरोरा-भद्रावतीच्या आमदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, प्रकाश देवतळे, माजी चंद्रपूर कृऊबा सभापती दिनेश चोखारे यांच्यासह आठ जणांनी रितसर अर्ज करून उमेदवारी मागितली आहे.
त्यामुळे आगामी काळात लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात चांगलीच चुरस होणार आहे. दरम्यान कुणबी व तेली समाजाच्या उमेदवारांचा समावेश आहे.
प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी १० जानेवारीपर्यंत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागितले होते. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा राजुराचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडे आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शंतनु धोटे, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे तथा शिवा राव यांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत.
तर चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व वरोरा येथील डॉ. हेमंत खापने यांनी उमेदवारीसाठी अर्ज दिले आहेत.