चंद्रपूर:- मूल येथील कर्मवीर महाविद्यालयात झालेल्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. परिणामी महाविद्यालयाने सलग तिसऱ्यांदा सांघिक ढाल पटकाविली आहे.
कर्मवीर दादासाहेब कन्नमवार जयंती दिनानिमित्ताने कर्मवीर महाविद्यालयात 'समाजाच्या उन्नतीचा मार्ग म्हणजे आरक्षण होय?' या विषयावर राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा घेण्यात आली होती. यात विषयाच्या बाजूने सरदार पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रलय म्हशाखेत्री, तर विषयाच्या विरूद्ध बाजूने याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी चांदणी धनकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. अजय बेले यांच्यासह प्रा. संदेश पाथर्डे, डॉ. सपना वेगीनवार, डॉ. संजय उराडे, डॉ. नीलेश चिमूरकर, डॉ. बिरादर, डॉ. अनिता मत्ते, डॉ. आरती दीक्षित, प्रा.अपर्णा तेलंग, प्रा.आशा सोनी आदींनी मार्गदर्शन केले.