Top News

महिलेच्या बॅगमधून 2.42 लाखाचे दागिने उडविले #chandrapur #gadchiroli

गडचिरोली:- रापमच्या एसटी बसमधील प्रवास सुरक्षित मानला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून रापमच्या बसमध्ये चोरीचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांना सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. सोमवारी, 12 फेब्रुवारी रोजी नागपूरहून गडचिरोलीला येणार्‍या महिलेच्या बॅगमधून सात हजार रुपयांच्या रोख रकमेसह 2 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेने गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.



प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली शहरातील कॅम्प एरिया परिसरात राहणारी प्राची समीर कनकावार ही महिला रविवारी नागपुरात आयोजित साक्षगंधाच्या कार्यक्रमाला गेली होती. सोमवारी सकाळी 10 वाजता ती तिच्या कुटुंबियांसह नागपूर बसस्थानकावरून गडचिरोलीला येणार्‍या बसमध्ये चढली. ही बस दुपारी दीड वाजता गडचिरोलीला पोहोचल्यानंतर महिला व तिचे कुटुंबीय बसमधून उतरून घरी गेले. मात्र घरी गेल्यानंतर महिलेच्या बॅगेची चैन तुटलेली आढळून आली. त्यामुळे बॅगची तपासणी केली असता बॅगेत ठेवलेले सोन्याचे दागिने व 7 हजार रुपये गायब असल्याचे आढळून आले. त्यामुळे महिलेने तत्काळ गडचिरोली पोलिस ठाणे गाठून घटनेची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने